लोणावळा : येथील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण आज दुपारी ओव्हरफ्लो झाले. शनिवार व रविवारच्या मुहूर्तावर धरण भरले असले तरी पर्यटनाला बंदी असल्याने धरणावर आज चिटपाखरु देखील नव्हते. मुंबई- पुणे या दोन्ही महत्वाच्या शहरांच्या मध्यावर असलेले लोणावळा शहर हे पावसाळी पर्यटनाकरिता प्रसिद्ध आहे. लाखो पर्यटक दरवर्षी येथे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येतात. यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा परिसरातील सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आल्याने शनिवार रविवार असला तरी धरणावर निरव शांतता होती. धरण परिसरातील स्थानिक युवकांनी धरण ओव्हरफ्लो झाल्याची माहिती दिली. लोणावळा शहरात कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे. आज दुपारपासून पावसाचा जोर वाढला आहे. पोलीस प्रशासनाने सकाळपासून धरण परिसरात तसेच लायन्स पाँईट परिसरात पर्यटक जाणार नाहीत याकरिता चेकपोस्ट लावले आहेत. लोणावळा शहरात आज अखेरपर्यत 649 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरापेक्षा भुशी धरण व लायन्स पाँईट या डोंगरी भागात जास्त पाऊस झाला आहे. धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले असले तरी पर्यटकांअभावी धरणाच्या पायर्या सुन्यासुन्या वाटत आहेत.
लोणावळा येथील पावसाळी पर्यटकांचे खास आकर्षण असलेले 'भुशी धरण ओव्हरफ्लो'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 5:52 PM
मुंबई- पुणे या दोन्ही महत्वाच्या शहरांच्या मध्यावर असलेले लोणावळा शहर हे पावसाळी पर्यटनाकरिता प्रसिद्ध आहे.
ठळक मुद्देशनिवार व रविवारच्या मुहूर्तावर धरण भरले असले तरी पर्यटनाला बंदी