लोणावळा, दि. 5 - सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी 9 ऑगस्ट क्रांतीदिन या दिवशी मुंबईत मराठा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईत होणा-या या मोर्चाबाबत जनजागृती करण्यासाठी लोणावळा शहर व ग्रामीण भागात शनिवारी दुचाकी रॅली काढण्यात आली.मागील वर्षभर राज्यभरातील विविध शहरांमध्ये मराठा समाजाच्या वतीने अनके मूकमोर्चे काढत शासनाचे लक्ष सकल मराठा समाजाच्या मागण्याकडे वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र शासनाकडून अद्याप मागण्याची दखल घेण्यात आलेली नसल्याने मुंबईत न भुतो ना भविष्य असा विराट मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चात जास्तीत जास्त मराठा समाजाने सहभागी व्हावे, याकरिता लोणावळा शहरातील भांगरवाडी राम मंदिर येथून दुचाकी रॅली काढत शिवाजी महाराज चौक, जयचंद चौक, मावळा चौक, गवळीवाडा नाका, वलवण, वरसोली, वाकसई, कार्ला या परिसरात बाईक रॅली काढली. यावेळी तरुणांनी मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. दोन दिवसांपूर्वी कार्ला गावात सकल मराठा समाजाची नियोजनाची बैठकही झाली होती.
मराठा क्रांती मोर्चा: समन्वयकांचा थेट चर्चेस नकार, मराठा आमदार सरकारसोबत चर्चा करणार
दरम्यान, मराठा समाजाच्या मागणीवरील चर्चा करण्याचे आवाहन करणा-या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना समन्वयकांनी नकार दिला. याउलट गुरुवारी मुंबईतील सकल मराठा समाजाच्या बैठकीत मराठा समाजाचे प्रतिनिधित्त्व करणारे सर्वपक्षीय आमदारच चर्चा करतील, असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जो काही निर्णय असेल, तो सरकारने ८ आॅगस्टपर्यंत विधानसभेत व ९ आॅगस्टच्या मोर्चासमोर जाहीर करावा, असा सर्वानुमते निर्णय झाल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले.
मराठा समाजाने निवडून दिलेल्या सर्वपक्षीय आमदारांना याआधीच चर्चेसाठी सकल मराठा समाजाने बोलावले होते. त्यासंदर्भातील बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झाली. त्याआधी मराठा समाजाचे नेतृत्त्व करणाºया विविध संघटना, प्रतिनिधी आणि नेत्यांची एक बैठक दादरमध्ये पार पडली. अखेर दोन्ही बैठकांनंतर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, आमदार आणि संघटनांची एक बैठक रात्री उशिरा मुंबईत पार पडली. या तीनही बैठकांनंतर मराठा समाजातर्फे सर्वपक्षीय आमदारच विधानसभा आणि विधानपरिषदेतून मागण्यांवर चर्चा करतील, असा निर्णय घेण्यात आल्याचे एका समन्वयकाने सांगितले.९ आॅगस्टला मुंबईत मराठा क्रांती मूक महामोर्चा कोणत्याही परिस्थितीत धडकणारच, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.