घोडेगाव : सायकल आणि पुस्तक हा उपक्रम म्हणजे जगण्याबरोबर पुस्तक असे समीकरण वाटते. तसेच दुर्गम आदिवासी गावांमध्ये मदत उपलब्ध होऊ लागली, तर देश नक्कीच विकसित होईल. त्याकरिता धर्मादाय आयुक्तालयातर्फे देण्यात येणाऱ्या सुविधा प्रबळ झाल्या तर जनसेवेची मोठी मदत होईल, असे मत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्तकेले.
आम्ही पुणेकर संस्थेतर्फे व्हील फॉर एज्युकेशन या उपक्रमांतर्गत आंबेगाव तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात सायकल व शालेय शैक्षणिक साहित्य फलौंदे येथील शहीद राजगुरू ग्रंथालयात वाटप करून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी धर्मादाय सहआयुक्तदिलीप देशमुख, उद्योजिका नयना चोपडे, पंडित वसंत गाडगीळ, सरपंच मनीषा मेमाणे, आम्ही पुणेकर संस्थेचे सचिव हेमंत जाधव, अरविंद जडे, अखिल झांजले, दत्ता गायकवाड, समीर देसाई, अॅड. दिलीप हांडे, डॉ. वेदव्यास मोरे, डॉ. प्रियंका जवळे, शरद देशमुख, अशोक पेकारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांसाठी तीनशे पुस्तकेही देण्यात आली.
यावेळी दिलीप देशमुख म्हणाले, की शिक्षणासाठी खेड्यातील मुलांना ज्या सुविधा उपलब्ध करून देता येतील त्यासाठी नक्कीप्रयत्न करू. धर्मादाय आयुक्तालयाकडून दुर्गम आदिवासी भागात मुलांना एक हजार सायकलवाटपाचा प्रकल्प केला आहे. आम्ही पुणेकर संस्थेतर्फे व्हील फॉर एज्युकेशन या उपक्रमासाठी सायकली कमी पडल्यास मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.हेमंत जाधव म्हणाले, की आम्ही पुणेकर संस्थेच्या व्हील फॉर एज्युकेशन या उपक्रमांतर्गत आंबेगाव तालुक्यातील तळेघर, राजपूर, पिंपरी, चिखली फलौंदे, जांभोरी, पाटण, आघाणे अशा एकूण २३ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावातील विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमध्ये जाण्यासाठी प्रातिनिधीक स्वरूपात सायकल उपलब्ध करून दिल्या आहेत.तसेच अजून ५०० ते ६०० सायकल तत्काळ पुरवण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सहधर्मादाय आयुक्तांनी मदतीचे आश्वासन दिले आहे, असे सांगितले.यावेळी डॉ. नागनाथ कोतापल्ले म्हणाले, की वाचनातून माणसाला जगभरातील ज्ञान प्राप्त होते. अनेक गोष्टी समजतात, त्यामुळे माणूस विचार करू लागतो. आजच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घोकंपट्टी करण्याची सवय लावली आहे. तुम्हाला शिकवलेले ज्ञान समजून घेतले तर तुमची विचार करण्याची क्षमता वाढेल. विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन केले पाहिजे. नवे प्रश्न तेव्हा निर्माण होतील जेव्हा वाचायला सुरुवात करू, असे मत त्यांनी व्यक्तकेले.