पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबद्दल (MPSC) आक्षेपार्ह मजकूर लिहला किंवा तो शेअर केला किंवा अश्लील भाषेतील टीका-टिपणी/ संभाषण केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे एमपीएससीने स्पष्ट केले होते. त्यानुसार आयोगाबद्दल अश्लील अपशब्द वापरून शिवीगाळ केल्याप्रकरणी विठ्ठल चव्हाण या नावाने ट्विटर खाते असलेल्या व्यक्तीविरूद्ध गुन्हाही दाखल केला होता.
आता आयोगाकडून आणखी एक मोठी कारवाई झाली आहे. एमपीएससीने 4 उमेदवारांना कायमस्वरूपी प्रतिरोधित केले आहे. त्यामध्ये नागरे शुभम भारत, रामकिशोर धनराज पवार (बनावट प्रवेशपत्र अनुक्रमे वापर व तयार करणे), मनोज रतन महाजन (परीक्षेनंतर मूळ उत्तरपत्रिका सोबत घेऊन जाणे), विठ्ठल भिकाजी चव्हाण (समाजमाध्यमावर आयोगास शिवीगाळ करणे) या उमेदवारांचा समावेश आहे.
समाज माध्यमांवर केल्या जाणाऱ्या टिका-टप्पणीवर आयोगाकडून नजर ठेवली जात आहे. भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवार/व्यक्ती यांच्याकडून केल्या जाणाऱ्या असभ्य, असंस्कृत, असंसदीय व अश्लील भाषेतील टीका-टिपणी/ संभाषण केल्यास त्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रक गेल्या दोन महिन्यांपूर्वी एमपीएससीने प्रसिद्ध केले होते.