पुणे : कर्तव्यात कसूर केल्याने नारायणगाव येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील निरीक्षक, दुय्यम निरीक्षक व दोन कर्मचारी यांच्यावर निलंबित करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिले आहेत .या कारवाईने राज्य उत्पादन शुल्क अधिकार्यांमध्ये खळबळ माजली आहे.
नारायणगाव दारू उत्पादन शुल्क कार्यालयातील निरीक्षक जी. डि. कुचेकर , नारायणगाव बिट क्र १ चे दुय्यम निरीक्षक ए. ई. तातळे, जवान विजय घुंदरे, दिलीप केकरे याना निलंबित करण्यात आले आहे .
राज्य उत्पादन शुल्कच्या मुंबई भरारी पथकाने दि. २५ जुलै रोजी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील ४ परमिट रुम व एका देशी दारूच्या दुकानावर छापा टाकून विना वाहतूक पास असलेला विविध कंपन्यांचा देशी व विदेशी दारू आढळून आल्याने मुंबई येथील भरारी पथकाने वरिष्ठ कार्यालयात कारवाईचा अहवाल सादर केला. या अहवालानुसार नारायणगाव दारू उत्पादन शुल्क कार्यालयातील निरीक्षक कुचेकर, दुय्यम निरीक्षक तातळे, जवान विजय घुंदरे, दिलीप केकरे यांनी नारायणगाव कार्यालय अधिकार क्षेत्रातील या बाबींकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही असे प्रकार उघडकीस न आणल्याने व या कार्यक्षेत्रात अनेक प्रकारचे गंभीर विसंगती प्रकरणे आढळून येऊनही वरिष्ठाच्या आदेशाचे पालन न करता व कोणतीही कारवाई न केल्याने कर्तव्याशी कसूर व शासनाची प्रतिमा मलीन केल्याचे सिद्ध झाल्याने या ४ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे .