पुणे : टेम्पोवर अत्यावश्यक सेवेचा बोर्ड लावून त्यातून बेकायदेशीरपणे गुटखा व तंबाखुची वाहतूक करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने फुरसुंगीजवळ एक टेम्पो पकडून त्यातून १० लाखांचा माल जप्त केला आहे.मंदार राजेंद्र ठोसर (रा. अवधूत बिल्डिंग, हडपसर) आणि मनोज सुमतीलाल दुगड (रा.भक्तीविहार, भेकराईनगर, फुरसुंगी) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी प्रमोद टिळेकर व अमोल पिलाणे यांना भेकराईनगरमधील दोघे जण टेम्पोतून गुटख्याची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला असता अत्यावश्यक सेवा असा बोर्ड असलेला एक टेम्पो पोलिसांना दिसला. पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली.तेव्हा त्यात गुटखा व तंबाखु असा ९ लाख १४ हजार रुपयांचा माल आढळून आला.पोलिसांनी टेम्पोसह १२ह जार १४ हजार ५२९ रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चनसिंह, पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडिक, कर्मचारी उदय काळभोर, रमेश गरुड, प्रमोद टिळेकर, अमोल पिलाणे, मोहन येलपले यांच्या पथकाने केली.