पुणे : धायरी येथील डीएसके रोडवरील अलोक पार्क सोसायटीत बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने एकच घबराट उडाली़ या स्फोटाच्या आवाजाचा हादरा बसून एका घराची काच फुटली़ त्यामुळे सुरुवातीला बॉम्बस्फोटाची अफवा पसरली होती़,पोलिसांनी शोध घेतला असता परिसरात फटाक्याचा बॉक्स व बॉल बेअरिंगचे काही तुकडे सापडले़ पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडला असावा़ ज्यांनी हा फटाक्याचा स्फोट घडविला, त्यांच्या गाडीचा नंबर पोलिसांना मिळाला आहे़
याबाबतची माहिती अशी, धायरीतील डिएसके रोडवरील आलोक पार्क सोसायटीमध्ये बुधवारी पहाटे स्फोटाचा आवाज आला. फटाक्यांसारख्या मोठ्या आवाजाने एका घराची काच फुटली. आवाजामुळे काही काळ परिसरात घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील पथकासह घटनास्थळी दाखल झाले़ पोलीसांनी सोसायटी व परिसरात कसून शोध घेतला. बॉल बेरिंगचे तुकडे परिसरात सापडले.एकाच घराच्या खिडकीची काच फुटली असल्याने हा प्रकार कोणी तरी जाणीव पुर्वक केला असावा.तसेच फटाक्याचा एक बॉक्स सापडला आहे़ स्फोटामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही़. मात्र या आवाजाची परिसरात दिवसभर एकच चर्चा होती़
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले की, हा प्रकार बॉम्ब स्फोटाचा नाही़. पहाटे च्या सुमारास वाहनांतून आलेल्या व्यक्तींनी स्फोटक फेकल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. घराची काच फटाक्यातील रॉकेटने फुटली की दगडामुळे हे निश्चित होऊ शकले नाही़ स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.