पुणे : विधानसभेच्या रणधुमाळीत अनेक पक्षांना धक्के बसू लागले आहेत. पुण्यातही भाजपला मोठा धक्का बसला आहे. हडपसर, वडगाव शेरी, धनकवडी भागातून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे एकाच वेळी ५ पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात पुण्यात घडलेल्या या राजकीय घडामोडीने चर्चाना उधाण आलं आहे.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीपआबा तुपे, साधना बँकेचे माजी संचालक अनिल तुपे हे हडपसर मतदार संघातील, वडगाव शेरी येथील माजी नगरसेविका रेखा टिंगरे, चंद्रकांत टिंगरे, त्याचप्रमाणे धनकवडी परिसरातील समीर धनकवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. तेथील उमेदवारांना विजयी करण्यामध्ये आमचं मोलाचं योगदान राहिल, असा शब्द दिला आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार या पक्षाचे जिल्हा प्रतोद रामभाऊ भोकरे यांनी देखील शरदराव पवार पक्षामध्ये प्रवेश केला. पुण्यात आज शरद पवारांची सभा
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारासाठी १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता माळवाडी येथील महापालिकेच्या नाट्यगृहासमोर जाहीर सभा होणार आहे.
हडपसर- वडगाव शेरीमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार
हडपसर आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत होणार आहे. अशातच या दोन्ही मतदारसंघात पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.