पुणे : पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची अवघ्या तीन महिन्यातच शनिवारी ( दि . ११) तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.त्यांच्या जागी पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार हे नवीन महापालिका आयुक्त असणार आहे.
शेखर गायकवाड यांना पुणे महापालिकेच्या आयुक्त पदाचा कारभार स्वीकारून अवघे तीन महिनेच उलटले होते. त्यांनी सौरभ राव यांच्याजागी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु लॉकडाऊन संदर्भात त्यांनी वेगळी भूमिका घेतल्याने त्यांची बदली करण्यात आली असल्याची चर्चा आहे. आता पुन्हा एकदा गायकवाड हे साखर आयुक्त म्हणून काम पाहणार आहे.
विक्रम कुमार हे २००४ च्या आयएएस अधिकारी आहेत. पीएमआरडीएचे तात्कालीन आयुक्त किरण गित्ते यांच्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला होता. आता ते पुणे महापालिका आयुक्त म्हणून काम पाहणार आहे. त्यांच्यासमोर पुुणे शहरात वेगाने फोफावत चाललेली कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्याजागी कृषी आयुक्त असलेले सुहास दिवसे यांची बदली करण्यात आली आहे. पाचवे अधिकारी जितेंद्र दुडी यांची मंचर उपविभागीय उप जिल्हाधिकारी पदावरून सांगली जिल्हापरिषदेच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याचे साखर आयुक्त असलेले सौरभ राव यांना पुण्याचे विशेष अधिकारी, विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुण्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची साखर आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.