लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अवकाळी पाऊस आणि बदलते हवामान यामुळे मार्केट यार्डातील कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. यामुळेच कांद्याचे ५०-७० रुपये किलोपर्यंत वाढले होते. परंतु नवीन गरवी कांद्याचा हंगाम सुरू झाल्याने मार्केट यार्डातील आवक वाढली आहे. त्यामुळे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी घाऊक बाजारात एक किलो कांद्याचा ३० ते ३५ रुपये असणारा भाव आता १० ते १३ रुपयांवर आला आहे. पुढील महिनाभर कांद्याचे कमी झालेले भाव कायम राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. किरकोळ बाजारात एक किलो कांद्याची २० ते ३० रुपयांनी विक्री केली जात आहे.
पुणे बाजार समितीच्या मार्केट यार्डात कांद्याची दररोज सुमारे ५० ट्रक आवक होत आहे. यात पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक आवक होत असून सातारा, नगर जिल्ह्यातून कमी प्रमाणात आवक होत आहे. घाऊक बाजारात १० किलो कांद्याला प्रतवारीनुसार १०० ते १३० रुपये भाव मिळत आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी हे भाव ३०० ते ३५० रुपयांवर होते. सुमारे पंधरा दिवसांपासून कांद्याचे भाव कमी होत चालले आहेत. सध्याचे कांद्याचे भाव महिनाभर तरी टिकून राहतील, अशी माहिती मार्केट यार्डातील कांद्याचे आडतदार रितेश पोमण यांनी दिली.
केरळमधून मागणी
पोमण म्हणाले, महाराष्ट्रातील कांद्याला दक्षिणेकडील राज्यांतून मोठी मागणी असते. कर्नाटकमध्ये स्थानिक कांद्याचे उत्पादन चांगले झाले आहे. परिणामी तेथून कांद्याला होणारी मागणी घटली आहे. केरळमधून केवळ मागणी आहे. गुजरातमध्येही कांद्याचे चांगले उत्पादन असल्याने तेथूनच कांदा परराज्यात विक्रीस पाठविला जात आहे.