पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था (बीएचआर) या संस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील बडा मासा अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. या प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी सुनील देवकीनंदन झंवर (रा. जयनगर, जळगाव) याला मंगळवारी (दि. १०) आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकमध्ये अटक केली.
डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात २५ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त शिक्षिका तथा ठेवीदार रंजना खंडेराव घोरपडे (६५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या पतपेढीविरुद्ध फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. आतापर्यंत तपासात सुमारे ६२ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे तपासात पुढे आले आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार जितेंद्र कंडारे याला दोन महिन्यापूर्वी इंदूर येथून अटक करण्यात आली. तो सध्या कारागृहात आहे. झंवर व कंडारे या दोघांना न्यायालयाने फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. जिल्हा व उच्च न्यायालयाने दोघांचा अटकपूर्व जामीन वेळोवेळी फेटाळून लावला होता. झंवर हा वेशांतर करून जळगाव, मुंबई, राजस्थान व इंदूर येथे वावरत होता. पोलिसांचे पथक गेले नऊ महिने त्याच्या मागावर होते. तो नाशिकच्या पंचवटी परिसरात असल्याची माहिती मिळाली. सोमवारी (दि. ९) आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे सापळा रचला होता. पोलिसांना पाहताच भिंतीवरून उडी टाकून पळून जात असताना पोलिसांनी त्याला पकडले. पोलीस निरीक्षक सुचेता खोकले व त्यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी त्याला अटक केली.
- - - - -