पुणे : परदेशात व्होक्सवॅगन कंपनीत सिनिअर जनरल मॅनेजर पदावर नाेकरी देण्याच्या आमिषाने भामट्याने तरुणाची ११ लाख ९१ हजार ४१९ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. या गुन्ह्यातील आराेपी हरियाणातील गुडगाव येथे असल्याची माहिती मिळताच सायबर पोलिसांनी त्याला तेथून अटक केली. परमानंद मलिक (२९) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना शालिनी शर्मा व करण सिंग नावाच्या व्यक्तींनी माेबाइलवर संपर्क साधला. ते टाॅप करिअर कन्सल्टन्सी या सल्लागार कंपनीत काम करत असल्याचे सांगून त्यांनी तक्रारदाराच्या ई-मेलवर मेल पाठवून परदेशात व्होक्सवॅगन ग्रुपमध्ये सिनिअर जनरल मॅनेजर पदावर नाेकरी मिळवून देताे, असे सांगितले. त्यासाठी वेगवेगळी कारणे सांगत शालिनी शर्मा आणि करण सिंग यांनी वेळाेवेळी ११ लाख ९१ हजार ४१९ हजार रुपये घेतले. मात्र, काेणतीही नाेकरी न देता तरुणाची फसवणूक केली. ही बाब लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसात धाव घेतली.
पोलिसांनी या गुन्ह्यातील आराेपींनी गुन्हा करताना वापरलेले माेबाइल क्रमांक, मेल आयडी व पेमेंट करण्यासाठी दिलेल्या लिंक व वेगवेगळ्या बँक खात्यांचा तांत्रिक तपास करून आराेपींचा ठावठिकाणा मिळवला. त्यानुसार ते दिल्ली, गुडगाव व हरियाणा येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सायबर गुन्हे शाखेचे पथक गुडगाव येथे जाऊन त्यांनी आराेपी परमानंद मलिक याचा शाेध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या. दरम्यान, आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, त्याला चार दिवसांची पोलिस काेठडी ठोठावण्यात आली आहे.
संबंधित आराेपीकडून एक लॅपटाॅप, तीन माेबाइल व गुन्ह्यातील फसवणुकीची १२ लाखांची रक्कम हस्तगत केली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पाेकळे, सहायक पोलिस आयुक्त नंदा पाराजे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल पाटील, उपनिरीक्षक सचिन जाधव, उपनिरीक्षक संदीप कदम, अंमलदार राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, नीलेश लांडगे, रेणुका रजपूत आणि नीलम नाईकरे यांच्या पथकाने केली.