पुणे: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या चाकण एमआयडीसी परिसरात स्फोटकं लावून एटीएम मशीन फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटना मध्यरात्री घडली असून, स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, स्फोट घडवून चोरट्यांनी पैसे घेऊन पोबारा केला आहे. स्फोटात एटीएमच्या खोलीच्या दरवाजाच्या काचा आणि पत्रे लांबपर्यंत उडून गेले, यावरुन स्फोटाच अंदाज लावता येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील चाकण एमआयडीसी परिसरातील आंबठान गावाजवळ हिताची कंपनीचे एटीएम(ATM) आहे. मध्यरात्री त्या एटीएममध्ये अचानक स्फोट झाला. एटीएम सेंटरमध्ये झालेल्या या स्फोटामुले परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशिष्ट प्रकारच्या स्फोटकांनी हा स्फोट घडवून आणल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
स्फोटात एटीएम मशिनचा अर्धा भाग फुटला असून काचांचा चक्काचूर झाला आहे. स्फोटामुळे मशिनमधील काही रक्कम बाहेर फेकली गेली तर काही रक्कमही न फुटलेल्या भागात सुरक्षित आहे. पण, मशीनमध्ये एकूण किती रक्कम होती आणि चोरीला किती गेली हे अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी स्फोटाच नेमकं कारण शोधण्यासाठी श्वान पथक तसेच बॉम्ब शोधक आणि नाशक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहेत.