आळंदी : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदा संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी सोहळा व अन्य प्रमुख कार्यक्रम मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. यापार्श्वभूमीवर सोमवारपासून (दि.२८) आळंदीसह चऱ्होली खुर्द, केळगाव, डूडूळगाव, चिंबळी, वडगाव -घेनंद, कोयाळी, धानोरे, सोळू, मरकळ, चऱ्होली बुद्रुक, चोविसावाडी अशा अकरा गावांत ४ जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे परवानगी नसलेल्या एकाही भाविकाला या काळात आळंदीत प्रवेश मिळणार नाही.
आळंदीत माऊलींच्या आषाढी वारी प्रस्थान सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुरू झाले आहेत. जेष्ठ वैद्य अष्टमी अर्थातच २ जुलैला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे आषाढी वारीसाठी मुख्य समाधी मंदिरातून प्रस्थान होणार आहे. यापार्श्वभूमीवर आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यात फक्त १०० वारकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. मात्र अनेकजण प्रस्थान सोहळ्याला आळंदीत येत असतात. परिणामी खबरदारीचा उपाय म्हणून प्रस्थान सोहळा कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
या कालावधीत आळंदीकडे येणारी खासगी तसेच सरकारी प्रवाशी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर शहरातील धर्मशाळा,भक्तनिवास, यात्रीभवन, लॉज, हॉटेल व मठात वारकरी आणि इतर मनुष्यास निवासास प्रतिबंध करण्यात आला आहे. तर पवित्र इंद्रायणी घाटावर २० जुलैपर्यंत फिरण्यास तसेच स्नान करण्यास मज्जाव केला आहे. अत्यावश्यक सेवा तसेच सोहळा पासधारकांना संचारबंदीतून वगळण्यात आले आहे.प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश व आळंदीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली.