बारामती: अष्टविनायकांपैकी एक असलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मोरगांव येथील मयुरेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी अर्थात मंगळवार (दि.२) बंद राहणार आहे. चतुर्थीला होणारी संभाव्य गर्दी व कोरोना रुगणांचा वाढता आकडा यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाने काढला आहे . याबाबतचे परिपत्रक बारामती तहसिलदार यांनी आज दि २७ रोजी दिले असल्याची माहीती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांनी दिली.
वर्षातून केवळ दोन अथवा तीन अंगारकी चतुर्थी येत असल्याने एक ते सव्वालाख भाविक मयुरेश्वर दर्शनासाठी तीर्थक्षेत्र मोरगांव येथे येतात . या दिवशी अष्टविनायकाच्या सर्वच तिर्थक्षेत्री राज्याच्या कानाकोपऱ्यातून गणेशभक्त येत असल्याने यात्रेचे स्वरुप आलेले असते .कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने मयुरेश्वर मंदिर बंद ठेवण्याचा आदेश बारामती तहसीलदार विजय पाटील यांनी दिला आहे.
अंगारकी चतुर्थीच्या दिवशी (दि २ ) मंदिर बंद राहणार असले तरी नियमित चालत आलेले धार्मिक पूजा,अर्चा, नैवद्य सुरू राहणार आहे . चतुर्थी दिवशी मंदिर बंद राहणार असल्याने भावीकांनी मंदिर अथवा मंदिर परिसरात न येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच बुधवार दि ३ रोजी पहाटे पाच वाजल्यापासून भक्तांना श्रींच्या दर्शनासाठी नियमीतपणे मंदिर सुरु राहणार आहे .