बारामती: मुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्या आरोपीला बारामतीतून अटक करण्यात आली आहे.राजेश पांडे असे या आरोपीचे नाव आहे. आरोपींला बारामती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बुधवारी रात्री बारामती-भिगवण रोडवरील अमृता लॉज मधून अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. मुंबई येथील गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी राजेश पांडे उर्फ राजेश दयाशंकर पांडे हा एका नामांकित हॉस्पिटलमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणुन नोकरीस होता. त्याने व त्याचे साथीदारांनी मिळुन भेसळ युक्त द्रव कोविड १९ ची लस असल्याचे भासवुन लोकांचा कॅम्प आयोजित केला होता. सिल तुटलेल्या व्हॅक्सीनच्या बाटल्यामध्ये लस देेत अनेकांची फसवणुक केली. लसीकरण केलेल्या लोकांना मुंबई मधील वेगवेगळया नामांकित हॉस्पिटलचे लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र देवुन त्यांची फसवणुक केलेली आहे.त्यामुळे आरोपी पांडे अटक चुकविण्यासाठी,पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी पुणे शहर व परिसरात आल्याची माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंके यांनी दिली.त्यानंतर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी स्वत: पथक तयार केले. आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी हा शहरातील अमृता लॉज या ठिकाणी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. आरोपी हा चाणाक्ष, हुशार व उच्च शिक्षित असल्याने त्यास ताब्यात घेण्यासाठी यावेळी पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले. पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक नामदेव शिंदे, सहा पोलीस निरिक्षक मुकुंद पालवे,पोलीस अंमलदार नवनाथ शेंडगे व सचिन कोकणे यांनी कारवाईत सहभाग घेतला.