मोठी बातमी : सुप्रिया सुळे Vs सुनेत्रा पवार लढाईचे स्पष्ट संकेत? बारामतीत फिरू लागला प्रचाराचा रथ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 02:17 PM2024-02-16T14:17:37+5:302024-02-16T14:24:07+5:30
सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता बळावली आहे.
Supriya Sule Vs Sunetra Pawar Baramati Loksabha ( Marathi News ) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना आव्हान देत वेगळी भूमिका घेतल्याने पक्षात उभी फूट पडली आणि काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या नेतृत्वाखालील पक्ष हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आहे, असा निकालही निवडणूक आयोगाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पवारांकडून राजकीय अस्तित्वाची लढाई लढली जाणार आहे. त्यामुळे अजित पवार हे आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना थेट बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. कारण सुनेत्रा पवार यांनी केलेल्या सामाजिक कामांची माहिती देण्यासाठी बारामती शहरात आजपासून एक प्रचाराचा रथ फिरू लागला असून या रथातील एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांनी केलेल्या कामांविषयी माहिती देण्यात येत आहे.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर मागील निवडणुकीत पक्षाने जिंकलेल्या चार लोकसभा मतदारसंघांमध्ये आपण आपल्या पक्षाचा उमेदवार देणार असल्याचं अजित पवार यांनी याआधीच घोषित केलं होतं. त्यामुळे अजित पवारांकडून सुप्रिया सुळे यांना उघड आव्हान दिलं जाणार, हे स्पष्टच होतं. मात्र सुळे यांच्याविरोधात ते थेट आपल्या कुटुंबातील कोणाला रणांगणात उतरवतील की नाही, याबाबत साशंकता होती. परंतु आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राजकारणात पूर्वीच्या तुलनेत अधिक सक्रिय झाल्याचं दिसून येत असून आज बारामती शहरात त्यांच्या प्रचारासाठी एक रथ फिरत असल्याचंही दिसून आलं. त्यामुळे सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आणखी बळावली आहे.
भाजप आमदाराची भेट अन् तब्बल तीन तास चर्चा!
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या भेटीगाठी वाढल्या असून त्यांनी कालच बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या दौंड विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार राहुल कुल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तब्बल तीन तासांच्या या भेटीत लोकसभा निवडणुकीच्या गणितांबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडून लोकसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू झाल्याची चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार या खरंच लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या तर विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना कठीण आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. कारण अजित पवार यांचे बारामती लोकसभा मतदासंघात येणाऱ्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघांत कार्यकर्त्यांचं प्रचंड नेटवर्क आहे. त्यांच्या जोडीला भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची ताकदही असणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.