पुणे : मागील सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली लोणावळा लोकल सोमवार (दि. १२)पासून धावणार आहे. पुणेरेल्वे स्थानकातून सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी पहिली लोकल सुटेल. तर सायंकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी दुसरी लोकल धावेल. लोणवळा येथून सकाळी व सायंकाळी प्रत्येकी एकच लोकल सोडण्यात येणार आहे. मात्र, लोकलमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
मागील अनेक दिवसांपासून सर्वसामान्य नागरिकांची लोकल सेवा सुरू करण्याची मागणी आहे. पण आताही केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याची त्यांची निराशा झाली आहे. राज्य शासनाकडून लोकल सुरू करण्यासाठी पोलिस आयुक्तांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात त्यांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत मागील आठवड्यापासून चर्चा सुरू होती. अखेर सोमवारी झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पुणे व लोणावळा येथून दररोज सकाळी व सायंकाळी याप्रमाणे प्रत्येक दोन गाड्या सोडण्यात येणार आहेत. लोकल प्रवासासाठी पोलिसांकडून डिजिटल पास दिले जाणार आहेत.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सर्व स्थानकांवर ये-जा करणाऱ्यांची थर्मल स्कॅनींगद्वारे तपासणी केली जाईल. स्थानक परिसरामध्ये येणारे व जाणारे मार्ग निश्चित केले जाणार आहेत. तसेच रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर परिसरामध्ये फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली आहे. रेल्वे स्थानक परिसरामध्ये स्थानिक नगरपालिका अधिकाऱ्यांकडुन दिशा दर्शक फलक लावण्यात येतील. तसेच स्थानकाच्या संपुर्ण परिसराचे बॅरीकेटींग केले जाईल. पुणे महानगर पालिकेच्या वतीने सर्व रेल्वे स्थानकावर समन्वय अधिकारी नेमले जातील. प्रत्येक फेरीनंतर रेल्वेगाडीचे निर्जतुकीकरण करण्याची दक्षता घेतली जाणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.--------------लोकलच्या वेळापुण्यातून - सकाळी ८.०५सायंकाळी ६.०५लोणावळ्याहुन - सकाळी ८.२०सायंकाळी - ५.०५--------------------लोकल सेवा कुणासाठी?पुणे शहर व पुणे महानगर पालिका हददीतील विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमपीएमएल, राज्य परिवहन विभाग, महावितरण यांसह सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच सर्व शासकीय व खाजगी सहकारी बँक, सर्व शासकीय व खाजगी रुग्णालये, रक्त तपासणी व प्रयोगशाळा, फार्मा कंपनी, आंतरराष्ट्रीय संस्था आदी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी.-------------