पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मंगळवारी तर शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा हजारांच्यावर पोहचला. त्याच पार्श्वभूमीवर शहरातील कोरोना वाढत्या प्रादुर्भावाला नियंत्रणात आणण्यासाठी आगामी काळात लॉकडाऊन नव्हे तर लग्नसोहळे, मंगल कार्यालये, जिम, स्वीमिंग टॅंक याबाबत आणखी काही कडक निर्बंध लावण्यात येईल असे स्पष्ट संकेत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहे आहेत.
महापौर मोहोळ म्हणाले, पुणे शहरातील कोरोनाबाबतची आढावा बैठक येत्या दोन दिवसांत पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीत शहरात काही निर्बंध लावण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी येणाऱ्या काळात संध्याकाळच्या वेळेस शहरातील उद्याने बंद करणे, तसेच स्विमिंग पूल आणि मंगल कार्यालयाबाबत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. मागील काही दिवसात शहरात कोरोना रुग्णांचा वाढता आलेख बघून हा निर्णय घेण्यात येणार आहे.
कोरोना संसर्गाचा प्रभाव शहरात मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. मंगळवारी दिवसभरात १ हजार ८६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०२० दरम्यान दिवसाकाठी हजारांच्या आसपास आढळणारी कोरोनाबाधितांच्या संख्येची पुनरावृत्ती शहरात पुन्हा सुरू झाली की काय असे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे. पॉझिटिव्हिटीची टक्केवारी १७. ८३ टक्के इतकी झाली आहे. गेल्या काही महिन्यातील हा सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट आहे.
येत्या दोन दिवसांत उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत होणार निर्णय
पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंतेचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या २ दिवसांत उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. त्यात शहरातील लग्नसोहळे, मंगल कार्यालये, जिम, स्विमिंग, उद्याने यांच्यसह नागरिकांवर आणखी कठोर बंधने लादण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.