मोठी बातमी: पुण्याला रेड अलर्ट, सतर्कता बाळगा; अजित पवारांकडून नागरिकांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 09:36 PM2024-08-03T21:36:47+5:302024-08-03T21:52:53+5:30
पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
Pune Rain News ( Marathi News ) : पुणे जिल्ह्यात असणाऱ्या धरणांच्या परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळू लागल्याने शहर आणि आसपासच्या भागात पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. आवश्यकता भासल्यास एनडीआरएफची मदत घेण्यासाठी त्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, अशीही माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
अजित पवार यांनी म्हटलं आहे की, "पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात येत आहे. खडकवासला धरणातून सध्या २७ हजार १६ क्युसेक्स, मुळशीतून २७ हजार ६०९ क्युसेक्स, पवनातून ५ हजार क्युसेक्स, चासकमान धरणातून ८ हजार ५० क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे. धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरु राहिल्यास विसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्यानेही पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ दिला आहे. यासंदर्भात मी पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी-चिचवडचे महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा केली असून त्यांना नागरिकांच्या जीवन आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना, कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत," असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.
भारतीय हवामान खात्याकडून पुणे आणि सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’
— PMC Care (@PMCPune) August 3, 2024
कोयना, खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरण क्षेत्रातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मा. श्री. @AjitPawarSpeaks यांच्याकडून आढावा, सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करण्याचे प्रशासनाला निर्देश pic.twitter.com/ylePCprt7B
🔴अत्यंत महत्त्वाचे🔴#खडकवासला, #मुळशी यासह विविध धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे #पुणे शहरातून जात असलेल्या विविध नद्यांची पाणीपातळी वाढत आहे.
— PMC Care (@PMCPune) August 3, 2024
या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मा.डॉ. राजेन्द्र भोसले यांनी पुणेकरांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. pic.twitter.com/XEaK30u3e7
"सखल भागातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा"
दरम्यान, "आवश्यकता भासल्यास एनडीआरएफची मदत घेण्यासाठी त्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने नागरिकांना संपूर्ण मदत, सहकार्य करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत," अशीही माहिती अजित पवारांनी दिली.