पुणे : पुणे शहरातील सर्व दुकानांना आता रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास पुणे महापालिकेने परवानगी दिली आहे. हे आदेश आजपासून लागू करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश शुक्रवारी जारी केले. हॉटेल, बार, रेस्टॉरंट यांना ५ ऑक्टोबर पासून रात्री १० वाजेपर्यंत राज्य शासनाने परवानगी दिली होती. मात्र अत्यावश्यक सेवांची म्हणजेच मेडिकल, दवाखाने आदी सेवा वगळता इतर व्यवसायास सायंकाळी ७ वाजेपर्यंतची मर्यादा कायम ठेवण्यात आली होती. यामुळे येऊ घातलेल्या सणासुदीच्या काळात शहरातील सर्व दुकानांना रात्री ९ पर्यंत परवानगी मिळावी, यासाठी व्यापारी वर्गासह सर्वच राजकीय पक्षांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व महापालिका आयुक्त यांच्याकडे सातत्याने मागणी केली होती. या मागणीस आज अखेर यश आले असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेऊन दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. यामुळे आता महापालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील अन्य अत्यावश्यक वस्तूंची दुकाने, सेवा (औषधी विक्री दुकाने, दवाखाने वगळून), अत्यावश्यक सेवा दुकानांव्यतिरिक्त इतर वस्तूंची दुकाने पूर्ण वेळ खुली राहणार आहेत. यात शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स हे देखील रात्री ९ पर्यंत खुली राहणार आहेत. मात्र, त्यामधील सिनेमागृह पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार आहेत.
पुणेकरांसाठी मोठी बातमी: शहरातील सर्व दुकाने आता ९ वाजेपर्यंत खुली राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2020 7:46 PM
शुक्रवारी मध्यरात्रीपासून आदेश लागू होणार..
ठळक मुद्दे