Pune Lok Sabha By Election ( Marathi News ) :पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची शक्यता मावळली आहे. कारण ही पोटनिवडणूक लवकरात लवकर घेण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. निवडणूक आयोगाने मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान पुण्यात पोटनिवडणूक घेण्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली.
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाला काही महिने उलटून गेल्यानंतरही निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम घोषित न झाल्याने शहरातील नागरिक सुघोष जोशी यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. खासदार गिरीश बापट यांचे २९ मार्च रोजी निधन झाल्यानंतर येथे पोटनिवडणूक झालेली नसल्याने या मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न लोकसभेत कोण उपस्थित करणार? असा सवाल विचारत पोटनिवडणूक घेण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला सूचना देण्यात याव्यात, याबाबत सुघोष जोशी यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर हायकोर्टात सुनावणी घेण्यात आली.
यावेळी निवडणूक आयोगाने बाजू मांडताना म्हटलं होतं की, आम्ही २०२४च्या निवडणूक कामात व्यस्त आहोत. तसेच देशात अन्य ठिकाणी निवडणुका सुरू आहेत. या कारणास्तव पुण्याची पोटनिवडणूक घेणे शक्य नाही. आता निवडणूक घेतली तर काही महिन्यांतच कार्यकाळ संपेल, असा प्रतिवाद आयोगाकडून करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही मुंबई हायकोर्टाने निवडणूक आयोगाला सुनावत लवकरात लवकर पोटनिवडणूक घेण्याचे आदेश दिले होते.
मुंबई हायकोर्टाने दिलेल्या या आदेशाविरोधात निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. त्यावर नुकतीच सुनावणी पार पडली असून सुप्रीम कोर्टाने पोटनिवडणुकीच्या आदेशाला स्थगिती दिल्याने पुणे शहरात पोटनिवडणूक होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.