NCP Sharad Pawar ( Marathi News ) :बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या भोर तालुक्यात आज महाविकास आघाडीची जाहीर सभा पार पडली. या सभेतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे याच पुन्हा या मतदारसंघातून मविआच्या उमेदवार असतील, अशी घोषणा केली आहे. तसंच गेल्या अनेक वर्षांपासून भोरच्या थोपटे कुटुंबियांसोबत असलेल्या सुप्त संघर्षालाही पवार यांनी आज पूर्णविराम दिल्याचं पाहायला मिळालं. सभा सुरू होण्याआधी शरद पवार यांनी भोरचे माजी आमदार अनंतराव थोपटे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर जाहीर सभेत अनंत थोपटे यांचे पुत्र आणि भोरचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांना भविष्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोठी संधी देण्याचं आश्वासनही अप्रत्यक्षरित्या दिलं आहे.
प्रचारसभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, "संग्राम थोपटे यांच्या हाती तुम्ही या भागाचं नेतृत्व दिलं आहे. तुमचं जे काही दुखणं असेल ते दूर करण्याची जबाबदारी तुम्ही त्यांच्यावर टाकली आहे. आज तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की, संग्राम थोपटे....तुम्ही जे काही या तालुक्यासाठी कराल, जिल्ह्यासाठी कराल, राज्यासाठी कराल त्यामध्ये हा शरद पवार तुमच्या पाठीशी कायम राहील. यापूर्वी आपले रस्ते वेगळे होते. मात्र इथून पुढे आता शरद पवारांचा पाठिंबा असल्यानंतर विकासाबाबत, राजकारणाबाबत काय परिवर्तन होऊ शकतं हे दाखवल्याशिवाय राहणार नाही," अशा शब्दात शरद पवार यांनी संग्राम थोपटे यांना भविष्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मोठी जबाबदारी देण्याचं आश्वासन दिलं आहे.
दरम्यान, आजच्या सभेतून शरद पवार यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त गुजरातचा विचार करतात. मोदी हे इतर साधन संपत्ती हिसकावून गुजरातला नेतात. गुजरातबद्दल आम्हाला आस्था आहे, मात्र इथले नुकसान करुन गुजरातला फायदा केला जात आहे. जो व्यक्ती राज्याच्या बाहेर विचार करत नाही तो देशाचा पंतप्रधान होऊ शकत नाही," अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.