पुणे : मुंबईप्रमाणे पुण्यातही लोकल सुरु करण्यास राज्य शासनाने तत्वता मान्यता दिली असून त्यासंबंधितच्या मार्गदर्शक सुचना आज जाहीर करण्यात आल्या आहेत. पुणे विभागात लोकल सुरु करण्याविषयी नोडल अधिकारी म्हणून पोलीस आयुक्तांनी संबंधित घटकांशी समन्वय साधावा, असे त्यात म्हटले आहे.याबाबत सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचा अभ्यास करुन लोकल सुरु करण्याबाबत संबंधित सर्व घटकांशी चर्चा करुन लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल.रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले की, राज्य शासनाकडून लोकल सुरु करण्यास सहमती मिळाली आहे. याबाबत रेल्वेचे विभागीय अधिकाऱ्यांची लोकल सुरु करण्याबाबत तयारी सुरु आहे. पोलीस आयुक्त व पोलीस अधिकाऱ्यांशी कोणत्या गाड्या, कधी व किती सुरु करायचा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल. त्यानुसार कोविड १९ बाबतच्या मार्गदर्शक सुचना लक्षात घेऊन सुरक्षेच्या विचार करुन लवकरच निर्णय घेतला जाईल. सध्या पुण्यातून पुणे -दानापूर ही एकच विशेष रेल्वेगाड्या चालविली जाते. या गाडीचे आरक्षित तिकीट असल्याशिवाय प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जात नाही. लोकल सुरु केल्यावर रेल्वे स्थानकावरील गर्दी वाढणार आहे. त्यादृष्टीने तिकीट खिडक्या, तेथे सामाजिक अंतर पाळणे, प्लॅटफॉर्मची स्वच्छता, सॅनिटायझरचा वापर, लोकलमधील सामाजिक अंतर पाळण्याविषयी जनजागृती, मास्कचा वापर अशा अनेक बाबींचा विचार करावा लागणार आहे.त्यात पुण्यातून लोणावळा दरम्यान लोकल तर पुणे -दौंड, बारामती दरम्यान डेमू लोकल धावत होत्या. त्यापैकी अगोदर कोणत्या व किती लोकल सुरु करायच्या याचा विचार करण्यात येणार आहे.
मोठी बातमी: मुंबईप्रमाणे पुण्यातही लोकल सुरु करण्यास राज्य शासनाचा 'हिरवा कंदील'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 9:10 PM
रेल्वे, पोलीस प्रशासन चर्चा करुन घेणार निर्णय..
ठळक मुद्देलोकल सुरु केल्यावर रेल्वे स्थानकावरील गर्दी वाढणार