PMC Election: भाजप, राष्ट्रवादी सारख्या मोठ्या पक्षाचे लहान पक्षातील प्रबळ कार्यकर्त्यांवर लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 05:41 PM2022-03-01T17:41:33+5:302022-03-01T17:41:50+5:30

महापालिका निवडणूक अद्याप जाहीर झालेली नसली तरी राजकीय पक्षांकडून आताच मोर्चेबांधणी सुरू

Big parties like BJP and NCP focus on strong workers in small parties in Pune Municipal Corporation election | PMC Election: भाजप, राष्ट्रवादी सारख्या मोठ्या पक्षाचे लहान पक्षातील प्रबळ कार्यकर्त्यांवर लक्ष

PMC Election: भाजप, राष्ट्रवादी सारख्या मोठ्या पक्षाचे लहान पक्षातील प्रबळ कार्यकर्त्यांवर लक्ष

Next

राजू इनामदार

पुणे : महापालिका निवडणूक अद्याप जाहीर झालेली नसली तरी राजकीय पक्षांकडून आताच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. खात्रीने निवडून येऊ शकतील, अशा जागांवर मोठ्या पक्षांमध्ये बंडखोरीची दाट शक्यता आहे. त्यावर लहान पक्ष लक्ष ठेवून आहेत. त्याचबरोबर उपनगरांमधील स्थानिक प्रबळ कार्यकर्त्यांना पक्षाकडे वळवून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

कशी आहे जागांची स्थिती?

भोवतालच्या गावांचा समावेश, मतदारांची वाढलेली संख्या यामुळे महापालिकेच्या इतिहासात यावेळी प्रथमच नगरसेवकपदाच्या १७३ जागा आहेत. त्यापैकी नवी गावे, उपनगरांमध्ये ९०- ९५ च्या आसपास जागा आहेत. जुने शहर, पेठा तसेच काही वर्षांपूर्वीच महापालिकेत आलेली गावे यात उर्वरित म्हणजे ७५ ते ८० जागा आहेत. एका प्रभागात ३ जागा व साधारण ५५ ते ६७ हजार मतदार अशी रचना करण्यात आली आहे.

राजकीय पक्षांचे बळ

सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसह अनेक पक्षांना सर्वच्या सर्व जागा लढवणे शक्य होईल, असे चित्र दिसत नाही. त्यांना नव्याने समावेश झालेल्या उपनगरांमध्ये तर उपनगरांमध्ये वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला शहराच्या मध्यभागांतील प्रभाग लढवण्यासाठी उमेदवार मिळवावे लागतील, अशी स्थिती आहे. काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष व शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी व अन्य पक्षांनाही १७३ जागांवर उमेदवार देता येतील, अशी स्थिती नाही.

मोठ्या पक्षांचे काय सुरू आहे?

भाजपकडून उपनगरांमधील स्थानिक प्रबळ कार्यकर्त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार नाही, पण निवडून येण्याची क्षमता आहे, अशांची नावे जमा केली जात आहेत. राष्ट्रवादीकडूनही तसाच प्रयत्न पेठांमध्ये होत आहे. कोणकोण हाताला लागू शकते, याची माहिती पक्षाचे पदाधिकारी घेत आहेत. काँग्रेसने तर आधीच त्यांची मतपेढी असलेल्या वस्त्या तसेच अन्य भागात पक्षप्रवेशाची मोहीमच सुरू केली आहे.

अन्य पक्ष काय करत आहेत.

शहरात सर्वत्र सध्या इच्छुकांचे फ्लेक्स लागत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या फ्लेक्सवरील उमेदवारांची वैयक्तिक माहिती काढणारी एक स्वतंत्र यंत्रणाच तयार केली आहे. त्यांची प्रभागनिहाय यादी तयार करण्यात येत आहे. इच्छुकांचा त्यांच्या पक्षाकडून भ्रमनिरास झाला की त्यांना उमेदवारी देऊन ताकद देण्याचा मनसेसह आम आदमी पार्टीचाही विचार सुरू आहे. शिवसेनेची सगळी मदार त्यांच्या शाखांवर आहे. बंडखोरांना आमच्याकडे थारा नसतो, असे त्यांच्याकडून सांगण्यात येते.

आरक्षणानंतरच होणार चित्र स्पष्ट

सगळ्याच राजकीय पक्षांच्या इ्च्छुकांना आरक्षणाची प्रतीक्षा आहे. बहुसंख्य नव्या इच्छुकांनी महिला आरक्षण पडले, तर काय? असा विचार करून फ्लेक्सवर आपल्याबरोबरच आपल्या सौभाग्यवतींचीही प्रतिमा झळकावली आहे. महिला आरक्षण, न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेले इतर मागासवर्गीय आरक्षण व अनुसूचित जातीजमातींचे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच जागा कोणत्या कशा, हे चित्र स्पष्ट होणार आहे.

Web Title: Big parties like BJP and NCP focus on strong workers in small parties in Pune Municipal Corporation election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.