भोर शहरासह ग्रामीण भागात या लसीकरण मोहिमेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. १६७४२१ पैकी ८४२९१ लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती भोर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, भोर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ.आनंद साबणे व तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी दिली.
सुरुवातीचे काळात या लसीकरण मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळत होता. त्ोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व तालुका प्रशासनाने पटवून दिल्यानंतर या मोहिमेला गती मिळाली असून, या लसीकरणामुळे कोरोनाबाधितांचे व कोरोनाला बळीं पडणाऱ्यांमध्ये आळा बसला आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत अपेक्षेपेक्षा मोठी घट झाली आहे.
याविषयीची अधिक माहिती देताना गटविकास अधिकारी विशाल तनपुरे म्हणाले, की कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना प्रशासनाने उभारलेले ४ कोरोना उपचार केंद्र कमी पडत होते. रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक वेळा रुग्णांना बेड उपलब्ध करुन देण्यात प्रशासन हतबल होत होते. अशा गंभीर स्थितीत काही वेळा गंभीर रुग्णांना पुणे येथील शासकीय व खासगी रुग्णालयांचा आसरा घ्यावा लागत होता.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींचे व काही सेवाभावी संस्थांचे प्रशासनाला बळ मिळाले. त्यामुळे नव्याने ६ कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात आले. यामध्ये ॲाक्सिजन बेड व व्हेंटिलेटर वाढवण्यात भर दिला. सर्व आरोग्य सुविधा कोरोनाबाधितांना मिळाल्याने बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले. आजपर्यंत तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६४५८ झाली असून, यातील ६२०४ जणांनी कोरोनावर मात केली असून उपचार घेणाऱ्याची संख्या प्रति दिवस १२०० वरुन आज ती अवघ्या १३२ वर खाली आली आहे. तालुक्यातील हीच संख्या तीन- चार दिवसांपूर्वी ९२ पर्यंत खाली आली होती.
भोर तालुक्यातील करोना बाधितांची संख्या घटण्यास लसीकरण मोहीम यशस्वी ठरत आहे.भोर तालुका पंचायत समितीच्या पाच प्राथमिक केंद्रात आणि सुमारे २६ उपकेंद्रात आणि भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण केंद्र उभारली असून आजअखेर तालुक्यातील वय वर्षे १८ ते पुढील वयोगटातील नागरिकांचे पहिल्या व दुसऱ्या लसीकरणाचे ग्रामीण भागात ७१ हजार ९६८ तर भोर उपजिल्हा रुग्णालयातील १२३३१ डोस देण्यात आले असून या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील १ लाख ६७ हजार ४१७ नागरिकांचे लसीकरणाचे प्रशासनाचे उद्दिष्ट असल्याचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी सांगितले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याची शासनाकडून शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार भोर प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केल्या असून, भोर उपजिल्हा रुग्णालयात बालकांसाठी स्वतंत्र कक्ष उभारला असून तेथे सर्व सोयीसुविधा निर्माण केल्या असून, रामबाग येथील स्काऊट, गाईडमध्ये स्वतंत्र कोरोना उपचार केंद्र बालकांसाठी तयार करण्यात आले आहे.