पुणे : ऑनलाईन आरक्षित तिकीटाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याने शहरातील आरक्षण केंद्रांकडे प्रवासी पाठ फिरवत आहेत. त्यामुळे शहरातील एकुण चार केंद्रांपैकी दोन केंद्र बंद करण्यात आली आहेत. तसेच रेल्वे स्थानकावरील आरक्षण खिडक्याही कमी करण्याचा विचार रेल्वे प्रशासनाकडून सुरू झाला आहे.शहरात पुणे रेल्वे स्टेशनसह डेक्कन, शंकरशेठ रस्ता, कॅम्प आणि रविवार पेठेत आरक्षण केंद्र होती. त्यापैकी रविवार पेठेतील केंद्र इमारती जुनी झाल्याच्या कारणास्तव काही दिवसांपुर्वीच बंद करण्यात आले आहे. तर शुक्रवारी (दि. ६) कॅम्पमधील केंद्र मंगळवार (दि. १०) पासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या केंद्रांवर आरक्षण करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याने केंद्र बंद केल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. प्रवाशांकडून सध्या ई-तिकीटींगलाच जास्त प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे प्रवाशांना त्याकडे वळावे, असे आवाहनही रेल्वेकडून करण्यात आले आहे.देशभरात रेल्वेचे आरक्षण करण्यासाठी ई-तिकीटींगचाच वापर अधिक प्रमाणात केले जात असल्याचे चित्र आहे. सुमारे ७० टक्क्यांहून अधिक आरक्षण आयआरसीटीसी च्या संकेतस्थळावरून होत आहेत. तर तिकीट आरक्षण केंद्रांवर हे प्रमाण केवळ ३० टक्क्यांहून कमी आहे. दिवसागणित त्यात घट होत चालली आहे. प्रामुख्याने ज्येष्ठ नागरीक, ऑनलाईन आरक्षणाची माहिती नसलेले, अशिक्षित प्रवासीच तिकीट खिडकीवर जाऊन आरक्षण करत आहेत. हे प्रमाण घटत चालल्याने देशभरातील आरक्षण केंद्र बंद पडू लागली आहे. त्यात आता पुण्याचाही समावेश झाला आहे. चारपैकी दोन केंद्र बंद करण्यात आली असून शंकरशेठ रस्ता व डेक्कन येथील केंद्रही प्रतिसाद आणखी कमी झाल्यास बंद केले जाईल, असे सुत्रांनी सांगितले. --------------पुणे रेल्वे स्थानकावर आरक्षण खिडक्यांची संख्या १० हून अधिक आहे. त्यामुळे तिथे नेहमीच जास्त गर्दी असते. पण भविष्यात या खिडक्यांची संख्याही कमी केली जाऊ शकते. याबाबत रेल्वेकडून विचार सुरू करण्यात आला आहे. ई-तिकीटींगलाच अधिक प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.-----------
ऑनलाईन आरक्षणाला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे खिडकीवरील तिकीटाला घरघर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2019 8:42 PM
केंद्रांवर आरक्षण करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याने ते बंद केल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे
ठळक मुद्देशहरात पुणे रेल्वे स्टेशनसह डेक्कन, शंकरशेठ रस्ता, कॅम्प आणि रविवार पेठेत आरक्षण केंद्र