पुणे: माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या खांद्यावर भारतीय जनता पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काकडे यांच्या नियुक्तीची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरुड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने संजय काकडे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. आगामी काळातील पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्वपूर्ण मानली जात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्राद्वारे संजय काकडे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. तसे पत्र देखील त्यांना पाठवले आहे.
"आपण गत काळात राज्यसभेत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेलव कार्य तसेच संसदेतील आपले उल्लेखनीय कार्य अभिनंदनीय आहे.आपल्या राजकीय व सामाजिक कार्याचा तसेच जनसंपर्काचा उपयोग पक्ष संघटन वाढीसाठी निश्चितपणे होईल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. आपल्या आगामी कारकीर्दीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा! " असा आशयाचे पत्र चंद्रकांत पाटील यांनी संजय काकडे यांना पाठविले आहे.
2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर संजय काकडे भाजपसोबत गेले होते. त्यामुळे त्यांना भाजपचे सहयोगी खासदार म्हणून ओळखले जाते. मात्र दुसऱ्यांदा भाजपकडून काकडे यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली नाही. त्यावेळी काकडे यांची उघडउघड नाराजी लपून राहिली नव्हती. पण आता प्रदेश उपाध्यक्षपदाची माळ गळ्यात टाकून काकडे यांची काही प्रमाणात नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपने केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.