पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पावर गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येपूर्वी पुण्यातील एकाने सोशल मीडियावर धमकीचा मजकूर प्रसारित केल्याचे उघडकीस आले आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये अलीकडील काळात तरुणांना भरती करून घेण्यात आले होते. त्यासाठी राजस्थान येथे भरती कॅम्प झाल्याची माहिती समोर आली आहे. या कॅम्पमध्ये शुभम लोणकर सहभागी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तेथूनच त्याचा बिश्नोई गँगशी संबंध आला असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
दरम्यान, ‘मला शोधू नका’, असे म्हणत बाबा सिद्दिकी खून प्रकरणात पोलिसांना पाहिजे असलेला लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित शुभम लोणकर पुण्यातून पसार झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. मुंबई पोलिसांकडून शुभम लोणकरचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी शुभमचा भाऊ प्रवीण याला रविवारी (दि. १३) पुण्यातून अटकही केली. दरम्यान, बिश्नोई गँगच्या पुणे कनेक्शनच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसही सतर्क झाले आहेत. त्यांनी लोणकर भावांची माहिती घेतली. शुभम आणि प्रवीण लोणकर मूळचे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील आहेत. शुभम लोणकर आणि त्याचा भाऊ प्रवीण लोणकर यांच्यावर अकोल्यात एक आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्याकडून एक पिस्तुलही जप्त करण्यात आले होते.
ते दोघे २०११ मध्ये पुण्यात स्थायिक झाले. तर, त्यांचे आई-वडीलही २०१९ मध्ये पुण्यात आले. कर्वे नगर परिसरात लोणकर कुटुंबीय राहत होते. २०२२ मध्ये त्यांनी डेअरी व्यवसाय सुरू केला होता, अशी माहिती पुणे पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
भंगार व्यावसायिकांकडे आरोपींची भेट...
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील फरार आरोपी शिवकुमार गौतम, शुभम लोणकर, धर्मराज कश्यप आणि प्रवीण लोणकर हे वारजे भागातील एका भंगार व्यावसायिकाकडे कामाला होते. तेथे त्यांची ओळख झाल्याची माहिती पुढे आली आहे. शुभम लोणकर हा शालेय शिक्षण घेत असताना, ‘एनसीसी’चा विद्यार्थी होता.