लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपीएमएल)तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात शनिवारी (दि. २९) विक्रमी रक्तदान झाले. एका दिवसात तब्बल ४ हजार २४९ पिशव्या रक्त जमा झाले. गेल्या दहा वर्षात एका दिवसात एका संस्थेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला मिळालेला हा राज्यातील सर्वात मोठा प्रतिसाद असल्याचा दावा केला जात आहे.
शनिवारी सकाळपासूनच ‘पीएमपी’च्या कर्मचाऱ्यांची लगबग सुरू होती. कर्मचाऱ्यांचा उत्साह वाखाजण्याजोगा होता. प्रत्यक्षात ७ हजार १९५ जण रक्तदानासाठी आले. मात्र विविध वैद्यकीय कारणांमुळे यातल्या २ हजार ९४६ जणांना रक्तदान करता आले नाही. अन्यथा रक्त पिशव्यांची संख्या आणखी वाढली असती. संकलित झालेले रक्त पुण्यातील २७ रक्तपेढ्यांना देण्यात आले. कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. हा तुटवडा दूर करण्यासाठी ‘पीएमपी’ने आपल्या पंधरा डेपोत रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.
चौकट
“पीएमपीने पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित केले. कर्मचाऱ्यांनी अभूतपूर्व प्रतिसाद देऊन ते यशस्वी केले.”
डॉ राजेंद्र जगताप, अध्यक्ष, पीएमपीएमएल,
चौकट
“पीएमपीचे रक्तदान शिबिर अभूतपूर्व आहे. केवळ कोरोना काळातील नव्हे, पुण्यातील नव्हे तर गेल्या दहा वर्षांत इतक्या मोठ्याप्रमाणात रक्तदान शिबीर राज्यात झालेले नाही. कोरोना स्थितीतले सर्व नियम पाळून हे शिबीर झाले.”
-राम बांगड, अध्यक्ष, रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट