Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात बोलताना राजकारण्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. राजा (शासक) असा असावा की त्याच्या विरोधात कुणीही बोलले तरी तो सहन करेल. लोकशाहीची ही सर्वात मोठी कसोटी आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. तसेच घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं. विश्वगुरु व्हायचं तर छत्रपती शिवरायांसारखे धर्मनिरपेक्ष व्हा असेही नितीन गडकरी म्हणाले.
पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी त्यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले. सत्ताधाऱ्याला आपल्या विरोधात असलेलं भक्कम मतही सहन करावं लागतं, ही लोकशाहीची सर्वात मोठी कसोटी असते, अशा शब्दात नितीन गडकरी यांनी सल्ला दिला आहे. लेखक आणि विचारवंतांनी निर्भयपणे व्यक्त व्हायला हवं असेही ते म्हणाले.
"लोकशाहीतील सर्वात मोठी परीक्षा म्हणजे राजाच्या विरुद्ध कितीही प्रखरपणे कोणी विचार मांडले तर राजाने ते सहन केले पाहिजे. आणि त्या विचारावर चिंतन केले पाहिजे. हीच खरी लोकशाहीमधील अपेक्षा असते. भारतात वेगवेगळी मते असायला हरकत नाही, पण इथे मतांच्या अभावाची समस्या आहे. आम्ही उजव्या विचारसरणीचे नाही आणि किंवा डाव्या विचारांचेही नाही. आम्ही फक्त संधीसाधू आहोत. लेखक आणि विचारवंतांनीही न घाबरता आपले मत मांडायला हवं. अस्पृश्यता आणि श्रेष्ठत्वाची धारणा जोपर्यंत देशात कायम आहे, तोपर्यंत राष्ट्र उभारणीचे कार्य पूर्ण होऊ शकत नाही," असे नितीन गडकरी म्हणाले.
"घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील. राजकारणात माझ्या मुलाचे कल्याण करा किंवा बायकोला तिकीट द्या असा काही राजकारणी आग्रह धरतात. जनता अशा लोकांना मत देते व त्यामुळे अशा गोष्टी अजूनही सुरू आहेत. ज्या दिवशी जनता ठरवेल की वारसा हक्काने आलेल्यांना मतदान करणार नाही. तेव्हा ते लोक एका मिनिटात सरळ होतील. कुणाचा मुलगा मुलगी असणे म्हणजे पुण्य किंवा पाप नाही. मात्र त्याने स्वतःची क्षमता सिद्ध केली पाहिजे व लोकांनी त्याला निवडणुकीत उभे करा असे म्हटले पाहिजे," असेही नितीन गडकरी म्हणाले.