पुणे: भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी कंटेनर चालकावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
अनिल नामदेव खळदकर (वय ४२, रा. कुंभारवळण, पो. खळद, ता. पुरंदर) असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणात महादेव मोहन कवटेकर (वय ३४, रा. गुंजुटी, ता. उबरगा, जि. धाराशिव, उस्मानाबाद) या कंटेनरचालकाला अटक करण्यात आली आहे. याबाबत राकेश वाघ (वय ३४, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत दुचाकीस्वार अनिल हे हडपसर परिसरातून जात असताना हडपसर-सासवड रस्त्यावरील ग्लायडिंग सेंटर येथे भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात ते गंभीर झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलिस निरीक्षक हसीना शिकलगार पुढील तपास करीत आहेत.