रांजणगाव सांडस (पुणे) : शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथे रस्त्यावर तुटलेल्या वीजवाहक तारेला स्पर्श झाल्याने या घटनेत विश्वनाथ चौरंग चव्हाण (वय २८) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विश्वनाथ हा कुटुंब चालवण्यासाठी उदरनिर्वाह म्हणून हमालीचे काम करीत होता.
रविवारी सायंकाळी कांद्याची गाडी भरण्यासाठी गेला होता. रात्री काम उरकल्यावर तो आपल्या मित्राला गाडी (एमएच १२ बीएल ७९२६) दुचाकीवरून घरी सोडण्यासाठी गेला होता. मित्राला सोडून घरी येत असताना रस्त्यावर तुटलेल्या वीजवाहक तारेला त्याची दुचाकी अडकली वीज प्रवाह सुरू असल्याने त्याला विजेचा झटका बसला. रात्रीच्या वेळी मदतीसाठी कोणीही नसल्याने या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
सोमवारी सकाळी या रस्त्यावरून नागरिक जात असताना ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता बाळासाहेब टेंगले, कनिष्ठ अभियंता वडगाव रासाई सुयश मुंगसे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. गरीब कुटुंबातील मृत विश्वनाथच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक भरपाई मिळावी, अशी मागणी घोडगंगा कारखान्याचे संचालक नरेंद्र माने व ग्रामस्थांनी मागणी केली आहे. पुढील तपास पोलिस नाईक संपत खबाले करीत आहेत.