पुणे : महापालिका निवडणुकांसाठी सर्वपक्षीय उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी करण्यात येणारा जाहिरात खर्च, कार्यकर्त्यांच्या भोजनावळी, झेंडे, उपरणी, बॅनर, अहवाल यावर होणाऱ्या रुपयाचा वैध आकडा धरला तरी तो, १२० कोटी २० लाख रुपयांच्या घरात जातो. सध्या विविध वस्तूंचे भाव जरी लक्षात घेतले, तरी हा खर्च किमान दोन अब्जांवर असेल, असेच दिसून येत आहे. महापालिकेच्या १६२ जागांसाठी ४१ प्रभागांमधून १ हजार १०२ उमेदवार रिंगणात उभे आहेत. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मर्यादेनुसार प्रत्येक उमेदवाराला जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा आहे. प्रत्येक उमेदवाराने हा निधी खर्च केल्यास किमान १२० कोटी, २० लाख रुपये खर्च होतील. अर्थात काही सन्माननीय अपवाद असेही, असतील की त्यांनी दहा लाख रुपयांच्या आत खर्च केला असू शकतो. अनेकदा दाखविला जाणारा खर्च आणि प्रत्यक्ष होणारा खर्च यात बरीच तफावत असल्याचे सहज लक्षात येते. शहरात विविध ठिकाणी पदयात्रा, घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेणे, वाहन रॅली, पत्रके आणि कार्यअहवालांचे वाटप, डिजिटल वाहनांद्वारे केला जाणारा प्रचार सुरू असल्याचे दिसत आहे. काही जणांनी तर प्रचारासाठी पक्षाच्या चिन्हाचा रथच तयार केला आहे. काहींनी लोकप्रिय गाण्यांचा आधार घेत ‘भाऊ, वहिनी, दादा, तार्इंची चित्रफित केली आहे. अनेक उमेदवारांनी घोषणा लिहून देण्यासाठी व्यावसायिक लेखकांची मदत घेतली आहे. याशिवाय छापील अथवा डिजिटल मतदार स्लीप देण्यासाठीदेखील मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात येत आहे. काहींनी डिजिटल स्लीप वाटपासाठी ८ ते ९ हजार रुपयांचे यंत्रदेखील खरेदी केले आहे. आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षचिन्ह असलेली उपरणी, टोप्या, बॅच-बिल्ले, झेंडे, पेशवाई पगड्या यांनादेखील मोठ्या प्रमाणावर मागणी असून, प्रत्येक उमेदवार सरासरी शंभर ते दोनशे उपरणे, बॅच आणि बिल्ल्यांची खेरदी करीत आहे. बाजारात एका बॅचची किंमत २ ते १०० रुपये, पक्षचिन्ह असलेली टोपी १० ते ३५, उपरणी ७ ते साडेतीनशे रुपये, तर पेशवाई पगडीची किंमत १ हजार ते २ हजार रुपयांदरम्यान आहे. याशिवाय पक्ष चिन्हाच्या कट आऊटसाठी आकारानुसार ५० ते २०० रुपये दर असल्याची माहिती मुरूडकर झेंडेवाले’चे गिरीश मुरूडकर यांनी दिली. प्रचारसाहित्य गोळा केल्यानंतर ते मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी सध्या रिक्षा हेच प्रभावी माध्यम ठरत आहे. तयार केलेल्या ध्वनीफिती, घोषणा यांचा प्रसार करण्यासाठी रिक्षावाले काकांचा उपयोग होत आहे. गल्ली बोळांमधे जाऊन प्रचारासाठी रिक्षांचा वापरच व्यवहार्य ठरत आहे. एका रिक्षावाल्याला दिवसाचे एक ते दीड हजार रुपये मिळत आहेत.
अब्जावधीची उलाढाल
By admin | Published: February 15, 2017 2:47 AM