लोकमत न्युज नेटवर्क
खोडद : जुन्नर तालुक्यात गुरूवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. हलक्या स्वरूपाचा पडणारा पावसाचा जोर रात्री ९. ३० च्या दरम्यान अचानक वाढला आणि मुसळधार पावसात रूपांतर झाले. काढणीला आलेली द्राक्ष अवकाळी पावसामुळे विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे मातीमोल होणार असल्याने द्राक्ष उत्पादक आर्थिक संकटात सापडणार आहेत. या अवकाळी पावसामुळे जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
हिवरे तर्फे नारायणगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी किरण भोर यांनी सांगितले की, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे २०२० हे वर्ष अत्यंत वाईट गेले आहे. त्यात निसर्गाने शेतकऱ्यांना साथ दिली नाही. जुन्नर तालुक्यात चालू वर्षी शेतकऱ्यांनी सुमारे २ हजार एकर क्षेत्रात द्राक्ष उत्पादन घेतले आहे. यामध्ये ब्लॅक जम्बो जातीची द्राक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच शरद सीडलेस,थॉमसन, आर. के.सोनाका या जातींची देखील द्राक्ष मोठया प्रमाणात आहेत. तालुक्यातील ही द्राक्ष सध्या १०० दिवसांची झाली आहेत. सध्या द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरण्याच्या अवस्थेत आहेत. अनेक बागांमध्ये द्राक्ष घडांमध्ये ५० टक्के पाणी उतरले आहे. मात्र, गुरूवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान होणार आहे.
गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ६ च्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे द्राक्ष मण्यांना आतून व बाहेरून देखील तडे जाणार आहेत. मण्यांना गेलेल्या तड्यांमध्ये डावणी व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका मोठा आहे. द्राक्ष मण्यांना तडे गेल्याने हा माल निर्यातक्षम राहणार नसून याचे मनुखे देखील तयार होणार नाही. एवढे मोठे नुकसान या अवकाळी पावसामुळे होणार आहे.
चौकट
अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हाताला काहीही लागणार नाही. द्राक्षांसोबतच पपई, डाळिंब आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना देखील या अवकाळी पावसामुळे आर्थिक फटका बसणार आहे.
विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने ही द्राक्षे निर्यात करण्यायोग्य राहणार नसल्याने नुकसान होण्याचे प्रमाण अधिक असणार आहे. यावर्षी द्राक्षांचे केवळ ५० टक्केच उत्पादन घेण्यात शेतकऱ्यांना यश आले आहे.
चौकट
मागील वर्षी झालेला सततचा पाऊस आणि वातावरणात होणारे सततचे बदल यामुळे मागचे वर्ष हे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. शासनाने जुन्नर तालुक्यातील द्राक्षांच्या बागांचे पंचनामे तातडीने करून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांना वेळीच भरीव व तातडीने आर्थिक मदत केली नाही तर मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांसारखी आत्महत्या करण्याची वेळ आपल्या शेतकऱ्यांवर येईल.
-माऊली खंडागळे शिवसेना तालुका प्रमुख, जुन्नर ================================ कॅप्शन : गुरुवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षांच्या घडांमध्ये पाणी साठले होते.हिवरे तर्फे नारायणगाव येथील किरण भोर यांच्या द्राक्ष बागेतील हे छायाचित्र.