लष्कर- शहरातील प्रसिद्ध कपड्यांच्या फॅशन स्ट्रीट मार्केटला शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास आग लागली होती. शनिवारी पहाटे पाचपर्यंत ही आग विझविण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात आला. या आगीत पाचशेहून अधिक दुकानांची राख झाली असून, कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
आग लागल्यानंतर रात्री अग्निशमन दलाचे बंब, महापालिका, कॅन्टोन्मेंटचे बंब आणि वॉटर टँकरद्वारे विझविण्याचा प्रयत्न केला. या आगीत दुकानांमधील सर्व माल जळून खाक झाला आहे.
फॅशन स्ट्रीट हे व्यापारी संकुल एम. जी. रोड व ईस्ट स्ट्रीट रोडच्या दरम्यान जवळपास दोन एकर परिसरात अतिशय दाटीवाटीने वसलेले आहे. संपूर्ण फॅशन मार्केटमध्ये पाचशेहून अधिक दुकाने आहेत. त्यामध्ये कपडे, पादत्राणे आणि इतर साहित्याचे दुकाने आहेत. पत्र्यांनी बांधलेली आणि एकमेकांना चिटकून असलेले हे मार्केट आहे. त्यामुळेच आग मोठ्या प्रमाणावर पसरली.
एम. जी. रोडवरील व्यापारी दुकानांसमोरच्या पदपथावर १९९७ पूर्वी व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांचे पुनर्वसन येथील दुकानदार यांच्या विरोधामुळे, वाहतुकीच्या अडचणीमुळे, कॅन्टोन्मेंट बोर्डाने १९९७ साली व्यावसायिकांना ‘कांबळे मैदान’ म्हणजेच आताचे फॅशन स्ट्रीट मार्केटला हलविले होते.
या ठिकाणी केवळ १ वर्षाच्या करारावर ४ बाय ५ म्हणजे २० चौरस फूट इतका ओटा दिला होता. त्यावेळी विक्रेत्यांची संख्या ४७१ एवढी होती. २००६ साली त्यात १२१ गाळे वाढवण्यात आले. परंतु आज येथील पार्किंगमध्ये देखील गाळे बसविल्याने त्याची संख्या हजाराच्या जवळपास आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ८ या वेळेत व्यवसाय करून प्रत्येकाने आपला माल घरी घेऊन जायचा, असा नियम केलेला आहे. बोर्ड व्यावसायिकांकडून २ ते ५ रुपये इतके भाडे डॅमेज चार्ज म्हणून घेत.
----------------
फॅशन स्ट्रीट धोकादायक असल्याचा अहवाल
२०१७ साली मुंबई येथील कमला मिल जळीतकांड नंतर २०१८ साली बोर्डाने पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्या फायर ब्रिगेड संयुक्तरित्या फॅशन मार्केटचे फायर ऑडिट करायला सांगितलं होते. त्या वेळी या तिन्ही फायर ब्रिगेडने धोकादायक व्यापारी संकुल म्हणून या फॅशन स्ट्रीटचा अहवाल दिला होता. बोर्डाने तो अहवाल नंतर जाहीर केला होता. पण त्या अहवालावर बोर्डाने काहीच कार्यवाही केली नाही.
--------------