पुणे : स्थायी समिती बैठकीत कार्यपत्रिकेवर असलेल्या विषयांपेक्षा आयत्या वेळी दाखल झालेल्या, शेकडो कोटी रुपयांच्या विविध निविदा मंगळवारी एकमताने मान्य करण्यात आल्या आहेत़ यामध्ये बहुचर्चित अशा ११ गावांमधील मैलापाणी वहन (ड्रेनेज) व प्रक्रिया योजनेची ३२३ कोटींची निविदा, भाजपच्या एका आमदाराशी संबंधित असलेली सुरक्षा रक्षक पुरविण्याची ४१ कोटी रुपयांची निविदा, तसेच सल्लागार नियुक्तीची १ कोटी ८२ लाख रुपयांची निविदा यांचा समावेश आहे़
स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने या मंजूर झालेल्या निविदांची पत्रकार परिषदेत माहिती दिली़ स्थायी समितीच्या बैठकीत आयत्यावेळी प्रशासनाकडून दाखल झालेले हे विषय, कोणताही विरोध न होता एकमताने मंजूर झाल्याचेही रासने यांनी यावेळी आवर्जुन सांगितले़
विशिष्ट ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून निविदांची रचना करण्यात आल्याचा ठपका ज्यामध्ये होता़ त्यापैकी महापालिकेमध्ये २०१७ मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ११ गावांमध्ये मैलापाणी वहन (ड्रेनेज) व प्रक्रिया योजनेची ३२३ कोटींची निविदेचा समावेश आहे़ या कामात पारदर्शकता नाही, मैलापाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी जागाही महापालिकेच्या ताब्यात नाही. केवळ एका ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून या निविदांची रचना करण्यात आली़ आदी आरोपांमुळे ११ गावांमधील मैलापाणी वहन व प्रक्रिया योजना गेली कित्येक महिने चर्चेत होती़ पण जशी काय जादूची कांडी फिरली व सर्व विरोध मावळून ही योजना आज एकमताने मंजूर झाली़ ज्या ठेकेदारावर आक्षेप घेतला गेला त्याच मे. खिलारी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. व एस.ए. इन्फ्रा या कंपनीला मिळाली असून, या कंपनीने ७. ८० टक्के कमी दराने निविदा भरली आहे.
-----------
चौकट १
ब्लॅक लिस्ट कंपनीचे ‘लाड’ ही पुरविले
राज्यातील इतर शहरांमध्ये ज्या कंपनीला ब्लॅक लिस्ट केले आहे, अशा मुंबईतील कंपनीलाच महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालये, मंडई, मनपा भवन, मध्यवर्ती कोठी आदी ठिकाणी सुरक्षा विभागामार्फत बहुद्देशीय कामगार पुरविण्यासाठीची ४१ कोटी रुपयांची निविदाही मंजूर करण्याचे ‘लाड’ आजच्या बैठकीत पुरविण्यात आले आहेत़ बहुद्देशीय कामगार या नावाखाली सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम मे. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीला देण्यात आले आहे़ ४१ कोटी ६ लाख रूपयांची ही निविदाही एकमताने मंजूर झाली आहे़
दरम्यान बहुउद्देशीय कामगार म्हणजे काय, सदर कंपनी ब्लॅकलिस्ट आहे का याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष रासने यांना विचारली असता, त्यांनी सुरक्षा विभागाचे प्रमुख माधव जगताप यांना बोलवितो असे सांगितले़ मात्र शेवटपर्यंत जगताप याबाबतची माहिती देण्यासाठी फिरकलेच नाही़ महापौर बंगल्यावर दुसऱ्या कामानिमित्त ते व्यस्त असल्याने येऊ शकत नाही हेच कारण शेवटपर्यंत देण्यात आले़