तळेगाव ढमढेरे : भामा-आसखेड धरणाचे पाणी ८५० क्युसेक्सने सोडण्यात आल्याने भीमा नदीवरील विठ्ठलवाडीपर्यंतचे बंधारे पाण्याने भरले आहेत. दि. १९ मेपर्यंत उर्वरित आलेगाव पागापर्यंतचे बंधारे भरले जाणार आहेत. या पाण्यामुळे शिरूर, दौंड, हवेली तालुक्यांतील १४ हजार हेक्टर क्षेत्रास ऐन उन्हाळ्यातही पाणी पुरणार असल्याचे कोंढापुरी येथील पाटबंधारे शाखा अधिकारी जे. डी. संकपाळ यांनी सांगितले. पाण्याची गरज लक्षात घेता तिसरे आवर्तन भामा-आसखेड धरणातून ८५० क्युसेक्सने ५ मेपासून भीमा नदीत सोडण्यात आले आहे. िशरूर-हवेली तालुक्यातील वढू बुद्रुक १६१, पेरणे ९२, बुरकेगाव ७३, सांगवी सांडस-विठ्ठलवाडी ९९ दशलक्ष फूट क्षमतेचे बंधारे या पाण्याने भरले असून, पाटेठाण ८६, शिवतक्रार म्हाळुंगी १४५, वडगाव बांडे ४२ व आलेगाव पागा १५८ दशलक्ष फूट क्षमतेचे शिरूर-दौंड तालुक्यांतील बंधारे १९ मेपर्यंत भरले जाणार आहेत. यामुळे शिरूर, हवेली, दौंड तालुक्यांतील भीमा नदीकाठालगतचे सुमारे १४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना या पाण्यामुळे दिलासा मिळाला आहे. उन्हाळ्यातील जनावरे व माणसांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सुटल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. भामा-आसखेड धरणात पाण्याचा साठा साधारण ६० टक्के उपलब्ध आहे. पावसाळा लांबल्यास गरज पडली तर चौथे आवर्तन सोडण्याची तरतूद आहे. शिरूर, हवेली, दौंड तालुक्यांना वरदान ठरणार्या भीमा नदीवरील आठ बंधार्यांमध्ये एकूण पाणीसाठा २५ दशलक्ष घनमीटर एवढा आहे. त्यामुळे सुमारे १४ हजार हेक्टर क्षेत्र बारमाही ओलिताखाली येत असल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर उसाचे पीक शेतकरी घेत आहे. (वार्ताहर)
भीमेवरील बंधारे तुडुंब
By admin | Published: May 13, 2014 2:38 AM