लोणी काळभोर : थेऊर (ता. हवेली) येथील मुळा-मुठा नदीतीरावर पुलाच्या कडेला धोकादायक जैववैद्यकीय कचरा टाकला जात आहे. याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले असून, या कचऱ्यामुळे पर्यावरणाबरोबरच नदीकाठच्या ग्रामस्थांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.पुणे-सोलापूर महामार्गावरून थेऊर, कोलवडी, केसनंद मार्गे पुणे-नगर महामार्गावर जाण्यासाठी बायपास म्हणून राज्यमार्ग क्रमांक ५८चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या मार्गावर थेऊर येथील मुळा-मुठा नदीवर असलेल्या थेऊर व कोलवडी ही दोन गावे जोडणाºया पुलाच्या कडेला यशवंत सहकारी साखर कारखाना संरक्षक भिंतीनजीकच्या वळणावर मोठ्या प्रमाणात जैववैद्यकीय कचरा टाकण्यात येत आहे. हा कचरा कोलवडी व थेऊर परिसरात असलेल्या खासगी दवाखाने व रुग्णालयातील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या ठिकाणी दवाखान्यात विविध आजारांवर वापरण्यात येत असलेल्या औषधाच्या मोकळ्या बाटल्या, वापरलेली इंजेक्शन व सुया आणि इतर वैद्यकीय कचरा टाकण्यात येत आहे. याचे मोठे ढीग नदीकीनारी तयार झाले आहेत. रुग्णालय अथवा दवाखान्याची नोंदणी करताना वैद्यकीय कायद्यानुसार जैववैद्यकीय कचरा विल्हेवाट करण्याबाबत काही बंधने घालून दिलेली आहेत. काही संस्थांच्या कचरा गोळा करणाºया गाड्या प्रत्येक ठिकाणी जात असतात. सर्वत्र फिरून संकलित करण्यात आलेला कचरा या संस्थांकडे असलेल्या आधुनिक यंत्रणेद्वारे नष्ट करण्यात येतो. त्यामुळे मानव किंवा पर्यावरणाला कसलीही हानी पोहोचत नाही. परंतु, या ठिकाणी हा कचरा उघड्यावर टाकला जात असल्याने परिसरात पर्यावरणाची हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कचरा शेतात गेला, तर यात असलेल्या सुया व काचांमुळे मोठी इजा होण्याचा धोका असून शेतकºयांकडे असलेल्या गाई-म्हशी या पशुधनासमवेत इतर पाळीव प्राण्यांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे. वैद्यकीय कचरा संकलन करणाºया संस्था हा कचरा जमा करून त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी काही रकमेची आकारणी करतात. हा पैसा वाचवण्यासाठी परिसरातील रुग्णालय व दवाखाने सर्वसामान्याच्या जिवाशी खेळत आहेत.
मुठा किनारी जैववैद्यकीय कचरा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 1:28 AM