लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजरी घेणे बंधनकारक असताना विभागीय आयुक्त कार्यालयात तात्पुरत्या कालावधीसाठी हलविण्यात आलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात अद्याप बायोमेट्रिक हजेरीची यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी कार्यालयीन वेळेत हजेरी लावण्याबाबत ‘ठेंगा’ दाखवत आहेत. कर्मचारी जागेवर नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकही त्रस्त झाले चित्र आहे.सुमारे तीन वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम सुरू आहे. त्यातच जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज तीन ठिकाणच्या इमारतीमध्ये विभागलेले आहे. त्यामुळे कोणत्या विभागाचे कामकाज कोणत्या ठिकाणी चालते, याबाबत नागरिकांना योग्य माहिती प्राप्त होत नाही. एकाच ठिकाणी कार्यालये नसल्यामुळे कधीही कार्यालयात यावे आणि कधीही घरी जावे, अशा पद्धतीने काही कर्मचारी काम करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी सध्या मस्टरवर स्वाक्षरी घेतली जाते. त्यामुळे कोणता कर्मचारी किती वाजता कार्यालयात येतो याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळत नाही. परिणामी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी साधारणपणे सकाळी साडेदहा वाजेपर्यंत कार्यालयात येणे अपेक्षित आहे. परंतु, अकरा- साडेअकरानंतर हळूहळू कर्मचारी कार्यालयात येत असल्याचे दिसून येते. प्रत्येक शासकीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेतलीच पाहिजे. त्यासंदर्भातील राज्य शासनाने वेळोवेळी सूचना दिल्या असून अध्यादेशही प्रसिद्ध केले आहेत. तात्पुरत्या स्थलांतरित कार्यालयातसुद्धा बायोमेट्रिक हजेरी असणे गरजेचे आहे. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
बायोमेट्रिकला ‘ठेंगा’
By admin | Published: June 22, 2017 6:54 AM