पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी विद्यापीठ प्रशासनातर्फे नवीन बायोमेट्रिक प्रणाली बसविली जात असून येत्या १ डिसेंबरपासून ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे उशीरा कामावर येणाऱ्या आणि लवकर घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवता येणार आहे. तसेच विद्यापीठात अधिक काळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘ओव्हर टाईमचा’मोबदला देण्यास मदत होणार आहे.राज्य शासनाने सर्व शासकीय कार्यालयासाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली होती. त्यानुसार विद्यापीठाने काही वर्षांपासून कर्मचाऱ्यांसाठी बायेमेट्रिक हजेरी सक्तिची केली होती. परंतु, विद्यापीठाकडून सध्या वापरली जात असलेली बायोमेट्रिक प्रणाली कालबाह्य झाली असून अनेक कर्मचाऱ्यांच्या बोटाचे ठसे स्वीकारले जात नाही. त्यामुळे विद्यापीठाने नवीन बायोमेट्रिक प्रणालीद्वारे ४ नोव्हेंबरपासून कर्मचाऱ्यांच्या बोटाचे ठसे आणि चेहऱ्याची ओळख घेण्यास सुरूवात केली आहे. येत्या १४ नोव्हेंबरपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांची माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे येत्या १ डिसेंबरपासून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेतली जाणार आहे.........विद्यापीठाच्या परीक्षा विभागासह शैक्षणिक व इतर विभागामध्ये काही कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेपेक्षा अधिक काळ बसून काम करावे लागते. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना जादा काम केल्याबद्दल ‘ओव्हर टाईम भत्ता’ दिला जातो. मात्र, कोणत्या कर्मचाºयाने किती तास जादा काम केले याचा हिशोब ठेवताना अडचणी येत होत्या. मात्र, नवीन प्रणालीमुळे जादा तास काम केल्याचा मोबदला देणे आता सोपे झाले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बायोमेट्रिक हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2019 12:00 PM
राज्य शासनाने सर्व शासकीय कार्यालयासाठी बायोमेट्रिक हजेरी केली बंधनकारक
ठळक मुद्देयेत्या १ डिसेंबरपासून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेतली जाणार