पुणे : देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांनी १९७८ मध्ये पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून तीन वर्षांचे प्रशिक्षण घेत, ते लष्करात दाखल झाले होते. लष्करात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. १ जानेवारी ते ३० ऑगस्ट, २०१६ या कालावधीत दक्षिण मुख्यालयाचे कामांडेन्ट म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. या दरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाचे बदल लष्करात केले. यानंतर उप लष्करप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. अतिशय धोरणी आणि दूरदृष्टी असलेले अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.
जनरल रावत यांचा पुण्याशी जुना संबंध होता. लष्कर प्रमुख असताना, अनेक लष्कराच्या कार्यक्रमांत ते उपस्थित राहिले होते. लष्करप्रमुख असताना, त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसहित विविध लष्करी आस्थापनांना भेटीही दिल्या आहेत. पुण्यात आयोजित विविध संयुक्त लष्करी सरावासाठी त्यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांनी नेहमीच तिन्ही सैन्य दलांमधील परस्पर सामंजस्य वाढविण्यावर भर दिला आहे. भारतीय सशस्त्र दलाचे शास्त्रास्त्रांच्या बाबतीत परकीय अवलंबित्व कमी असावे, यावर त्यांचा नेहमी भर असायचा. दक्षिण मुख्यालय प्रमुख या पदावर असतानाही त्यांनी लष्करात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर दिला होता. भारतीय सैन्य दलाचे सरसेनापती झाल्यानंतरही जनरल रावत यांनी पुण्यातील विविध लष्करी आस्थापनांना भेटी देऊन त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.
सरसेनापती रावत यांनी १५ नोव्हेंबर रोजी पुण्यातील मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ‘भारतीय सशस्त्र दलांचे एकात्मिकरण’ या विषयावर संरक्षण सेवा तांत्रिक कर्मचारी अभ्यासक्रमाचे १४२ विद्यार्थी अधिकारी यांना मार्गदर्शन केले होते. सक्षम असाल, तरच लष्करात या लष्करप्रमुख असताना ते पुण्यातील बॉम्बे स्यापर्स ग्रुप येथे एका कार्यक्रमात ते आले होते. यावेळी त्यांनी दिलेले भाषण चांगलेच गाजले होते. रावत तरुणांना उद्देशून म्हणाले, भारतीय लष्कर ही केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नाही. जर लष्करात दाखल व्हायचे असेल, तर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असायलाच हवे. तुमचा हौसला हा बुलंद असायला हवा. कुठल्याही कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याची ताकद तुमच्यात हवी. जिथे मार्ग सापडत नाही, त्या ठिकाणी मार्ग शोधण्याची क्षमता अंगी असावी. तेव्हा कुठे तुम्ही खऱ्या अर्थाने भारतीय लष्कराचे जवान म्हणून तुम्ही ओळखले जाल.