निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, शिरूर आणि वन्य पशु-पक्षी संरक्षण सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संयोजक पी. बी. जगताप व शेरखान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक वन्यजीव दिनानिमित्ताने टाकाऊपासून टिकाऊ अंतर्गत गोळ्या-बिस्किटांच्या प्लॅस्टिकच्या बरण्यांचा उपयोग पक्ष्यांना अन्न व पाणी ठेवण्यासाठी आकर्षक भांडी करून कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील नरेश्वर मंदिर परिसरात विविध झाडांना ही तयार करण्यात आलेली प्लॅस्टिकची भांडी बांधून त्यामध्ये पाणी व धान्य ठेवून पक्ष्यांची अन्नपाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हिवाळा संपत आला असून सध्या दिवसाचे कमाल तापमान आता हळूहळू वाढू लागल्याने प्राण्यांसाठीचे नैसर्गिक पाणवठे, ओढे, नाल्याचे स्रोत कमी होऊ लागल्याने निसर्गाच्या सान्निध्यातील पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ लागल्याने निसर्गातील वन्यजीव यांचे जीवन धोक्यात आले आहे.
वन्यजीव संवर्धनासाठी शिरूर तालुक्यातील सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्याने ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात वन्यजीवांची तहान-भूक भागणार आहे. विशेषता वेळोवेळी लक्ष देऊन अन्न व पाणी पुरवण्याची जबाबदारी घेतलेली आहे.
नरेश्वर मंदिर परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात केल्याने येथे पक्ष्यांचा चिवचिवाट दिसून येतो. विशेषता या परिसरात खारूताईचेही प्रमाण जास्त आहे. आज पाणी व धान्य उपलब्ध केल्याने पक्ष्यांचा चिवचिवाट आणखी वाढला आहे. यावेळी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे तालुकाध्यक्ष राजाराम ढवळे, कार्याध्यक्ष प्रवीणकुमार जगताप, उपाध्यक्ष सुरेश सातपुते, सचिव रामदास कांडगे, वन्य पशू-पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे शेरखान शेख, श्रीकांत भाडळे, बाळासोा मोरे, शुभम वाघ, अमोल कुसाळकर, विठ्ठल वळसे, शुभम यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त नरेश्वर मंदिर परिसरात पक्ष्यांसाठी अन्नपाणी उपलब्ध करून देताना विविध संस्थांचे पदाधिकारी.