लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पशुसंवर्धन विभागाच्या शुक्रवारी (दि. १५) रात्री आलेल्या अहवालात दौंडमधील बोरीबेल व मुळशीतील नांदे गावात बर्ड फ्लूची लागण झाल्याचे निदर्शनास आले. शनिवारी (दि. १६) सकाळीच तिथे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी गेले. दिवसभरात मुळशीत ६ हजार तर बोरीबेलमध्ये ७०० कोंबड्या नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पशुसंवर्धन विभागाकडे दौंड व मुळशी तालुक्यांमधील दोन गावांमधून मृत पक्ष्यांचे नमुने आणले गेले. त्यांच्या तपासणीचा प्रयोगशाळा अहवाल शुक्रवारी मिळाला. त्यात त्या चारही पक्ष्यांचे मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतरच लगेचच पशुसंवर्धन विभागाने जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागास याची माहिती दिली.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी विधाटे यांनी सांगितले की, नियमामुसार या दोन्ही गावांतल्या १ किलोमीटर परीघातील सर्व पोल्ट्री, तसेच घरगुती पाळलेल्या कोंबड्या नष्ट केल्या जात आहेत. नांदे (ता. मुळशी) गावातल्या ३ पोल्ट्रीमधील ६ हजार कोंबड्या नष्ट करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मानेत इंजेक्शन देऊन कोंबड्यांना आधी मारले जाते. त्यानंतर, त्या जमीनीत खोल खड्डा घेऊन त्यात पुरून टाकण्यात येतात. त्यावर भरपूर चुनखडी पसरण्यात येते.
चौकट
जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश
पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ.धनंजय परकाळे यांनी सांगितले की, जिल्ह्यात सगळीकडे सतर्कतेेचे आदेश दिले आले आहेत. अचानक मृत झालेल्या कोणत्याही पक्षी-प्राण्यांची माहिती तत्काळ पशुसंवर्धन विभागाला द्यावी. सध्या संसर्ग आढळलेल्या दोन्ही गावातील स्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यात अजून तरी संसर्ग फार पसरलेला नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, काळजी घ्यावी.