पुणे : खोपा दिसला की प्रत्येकाला छान वाटते. टुमदार घर आणि छानशा ठिकाणी असावे, अशी इच्छा माणसांची आणि प्राणी, पक्ष्यांचीदेखील असते. परंतु माणसांनी पक्ष्यांची घरे असलेली झाडं कमी केली आणि या पक्ष्यांना अन्यत्र आधार घ्यावा लागला. विहिरीवर संरक्षणासाठी लावलेल्या जाळीला आपलं घरटं तयार केलं. त्यामुळे आता ‘अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला’ या कवितेऐवजी आता ‘झोका तिने जाळीला टांगला’ असेच म्हणावे लागेल.
दिवसेंदिवस मोठी झाडे कमी होत आहेत; त्यामुळे पक्ष्यांना घरटे तयार करण्यासाठी योग्य जागा कमी होत आहेत. ज्या ठिकाणी कोणाला सहज जाता येत नाही, अशा ठिकाणी नर सुगरण घरटे बांधतो. कवडीपाट येथील एका विहिरीवर टाकलेल्या जाळीच्या मधोमध हे घरटे टांगले आहे.
कवडीपाट हे पक्षी निरीक्षण केंद्र आहे. येथे गेल्या कित्येक वर्षांपासून स्थलांतरित पक्षी पाहण्यासाठी पक्षी निरीक्षकांची गर्दी होते. आता हिवाळा सुरू होणार असल्याने कवडीपाटला पक्ष्यांचे येणे हळूहळू सुरू झाले आहे. सुगरण पक्ष्याचे काहीसे लांबोळे तर काही छोटे खोपे फांदीच्या टोकास लटकलेले पाहायला मिळत असतात. ते वाऱ्यावर झुलताना आकाशात पाळणा टांगावा, असे दृश्य अतिशय सुंदर दिसत असते. कितीही वादळ-पाऊस आला तरी हे सुगरणीचे घरटे फांदीला घट्ट बांधलेले असते. ते सुरक्षित राहते.
सुगरण पक्ष्याने बदलत्या काळामुळे स्वत:ला बदलून घेतल्याचे यावरून दिसते. जिथे सुरक्षित ठिकाण असते, तिथेच त्यांना घरटे बांधावे लागते. नर सुगरण घरटे बांधतो आणि मादी त्यात विणीसाठी येते. घरटे एकदा वापरले की, नंतर ते वापरले जात नाही. त्यातील काड्या वापरण्यासाठी इतर पक्षी नेतात; पण एक घरटे पुन्हा परत वापरले जात नाही, हे विशेष.विशाल तोरडे, पक्षी अभ्यासक.