सहकारनगरमध्ये निसर्गप्रेमी आणि मुक्त छायाचित्रकार पराग साळसकर यांनी ही छायाचित्रे काढली आहेत. त्यांच्या इमारतीच्या मागील बाजूस पाचगाव-पर्वती वनविहार आहे. मागील वर्षी पाचव्या मजल्यावरील शेजाऱ्यांकडे ते गेले असता सहज त्यांचे लक्ष सुमारे तीस-पस्तीस फूट उंचीच्या एक 'काटेसावरी'च्या झाडावर गेले. गेल्या वर्षी प्रथमच आलेले एक फूल वगळता ते आजपर्यंत कधीच फुलले नव्हते. यंदा मात्र खूप फुलले आहे.
साळसकर म्हणाले, ‘‘या वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रथमच त्या झाडावर काही कळ्या दिसू लागल्या. कदाचित पहिल्यांदाच फुुलल्यामुळे असेल पण फुले त्या मानाने कमी होती. ह्या मोजक्याच फुलांंचा सुगावाही कसा काय तो पक्ष्यांंना लागला आणि मधुुुरस चाखण्यासाठी पक्ष्यांची झुुंंबडच उडाली. पक्षी निरीक्षण आणि छायाचित्रणासाठी ही खूपच छान संधी होती. झाड जेमतेम २५-३० फूट लांब होते आणि जवळजवळ सगळीच फुले डोळ्यासमोर होती.’’
‘‘सूर्यपक्षी, साळुंक्या, बुलबुल, कोतवाल, चष्मेवाले, वटवटे, पोपट, हळद्या आणि क्वचित कावळा, साऱ्यांंनीच गर्दी केली. सूर्यपक्षी , वटवटे, चष्मेवाले यासारखे पक्षी अगदी अलगदपणे मध प्यायचे तसेच फुलांवर येणारे किटकही पटकन गट्टम करीत असत. बुलबुल, कावळे, पोपट मात्र जरा धसमुसळे पणाने वावरत आणि फुलांची नासधूस करत, पाकळ्याही तोडत. कधीकधी तर पोपट फुलांच्या पाकळ्याही खात. उमललेल्या ताज्या फुलातील पुष्परस मिळवण्यासाठी पक्ष्यांची आपापसात भांडणेही होत. हळद्या-मादीने हे झाड म्हणजे जणू दुसरे घरचं केले होते. अतिशय देखणा हळद्या-नर मात्र जेमतेम ५-१० मिनिटे येऊन भाव खाऊन जायचा. राखी धनेशही १-२ वेळा संध्याकाळच्या वेळी येऊन गेला.’’
--------------
सकाळच्या वेळात कोवळे ऊन यायला लागल्यापासून ते जवळ जवळ ११:३० वाजेपर्यंत हा खेळ चाले. दुपारी १ ते ४ मात्र बंद ! सकाळी एखादा तासभर जरी निरीक्षणात घालवला तरी १४-१५ प्रकारचे पक्षी दिसायचे. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून मात्र बहर ओसरला, फुले शुष्क झाली, कोमेजून खाली पडली आणि पक्ष्यांची गर्दी ओसरली.
- पराग साळसकर, निसर्गप्रेमी
————————————-