निलेश राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील पंधरा क्षेत्रिय कार्यालयांमधील आरोग्य विभागातील क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांना महापालिकेने ‘उपनिबंधक, जन्म-मृत्यू’ नोंदणीचे कामकाज करण्याचे अधिकार १० जून रोजी दिले. परंतु, अद्यापपर्यंत त्यांना कामकाज सुरू करता आले नाही. क्षेत्रिय कार्यालयांमध्ये या कामाकाजासाठी अंमलबजावणी करणारी यंत्रणाच उभी केलेली नाही. त्यामुळे नुसते अधिकार दिल्याने नोंदणीचे कामच सुरू झालेले नाही.
जन्म-मृत्यूचे दाखले हे नागरिकांना लवकर मिळावे. याकरिता महापालिकेने जन्म-मृत्यू घटनांच्या मुख्य नोंदी क्षेत्रिय कार्यालय स्तरावर करण्याचे आदेश दिले होते. यामुळे एकाच ठिकाणी नोंदी व तेथूनच दाखले वितरण ही नवी पध्दती लागलीच अंमलात येईल असे वाटले होेते. मात्र जन्म-मृत्यू घटनांच्या मुख्य नोंदी करण्याकरिता आवश्यक ‘उपनिबंधक, जन्म-मृत्यू नोंदणी विभाग कक्ष’च, अद्याप १५ क्षेत्रिय कार्यालयांपैकी एकाही कार्यालयांमध्ये कार्यान्वित झालेला नाही.
जन्म-मृत्यू नोंदणीच्या मुख्य कार्यालयात संपूर्ण शहरातील घटनांची संगणकीय नोंदणी होत असल्याने त्याला वेळ लागत आहे. यामुळे एकाच ठिकाणी नोंदी व तेथूनच दाखले वितरण करण्याचे ठरविण्यात आले. परंतु, स्वतंत्र कक्षच नसल्याने, येथे ना संगणक, ना संगणक ऑपरेटर, ना इंटरनेट कनेक्शन अशी स्थिती आहे. तसेच क्षेत्रिय कार्यालयांच्या हद्दीतील सर्व खाजगी हॉस्पिटलने जन्म-मृत्यू घटनांची कागदपत्रे दिली, तरी ती ठेवायची कुठे असा प्रश्न निर्माण झाल्याने, या सर्व खाजगी हॉस्पिटलने सदर कागदपत्रे मुख्य कार्यालयाकडेच पाठवावीत असे सांगितले जात आहे.
--------------
क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांना महापालिकेने उपनिबंधक, जन्म-मृत्यू नोंदणीचे कामकाज करण्याचे आदेश दिले असून, त्याबाबत या सर्व क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांना प्रशिक्षणही दिले आहे. त्यांना आवश्यक ते मनुष्यबळ व साधन सामुग्री ही आरोग्य विभागाकडून देण्यात येणार आहे. परंतु, क्षेत्रिय कार्यालयांनी त्यांना स्वतंत्र कक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- डॉ. कल्पना बळीवंत, जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय प्रमुख तथा सहाय्यक आरोग्य अधिकारी पुणे मनपा.
--------------------------