लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शाळेतील प्रवेशापासून, जन्मतारखेच्या पुराव्यासाठी प्रत्येक ठिकाणी अत्यावश्यक असतो तो ‘जन्म दाखला’. मरेपर्यंत सोबत करतो तो हा जन्मदाखला. पण हा दाखला मिळवण्यासाठी माता-पित्यांना, क्वचित पुढे जाऊन स्वत:लाच सरकारी कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात. मात्र, ससून रुग्णालयात जन्माला येणाऱ्या बाळांच्या माता-पित्यांचे हे हेलपाटे बंद होणार आहेत. बाळ जन्मल्यानंतर अवघ्या काही तासांत पालकांना जन्मदाखला मिळणार आहे. तशी यंत्रणा ‘ससून’मध्ये उभारली गेली आहे.
ससून सर्वोपचार रुग्णालयात दर वर्षी साधारणत: दहा ते अकरा हजार प्रसूती होतात. यातल्या अनेक गर्भवती या पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील, तसेच अन्य जिल्ह्यातल्याही असतात. मुलाच्या जन्मानंतर संबंधित बाळ-बाळंतीण घरी परतल्यावर, भविष्यात दोन-एक वर्षांनंतर बाळाच्या जन्म दाखल्यासाठी पालकांची धावपळ सुरू होते. मग ससून रुग्णालयात जाऊन प्रसूती संदर्भातील कागदपत्रे जमा करणे, ती नसतील तर ती मिळविण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात. रुग्णालयातून आवश्यक कागदपत्रे हाती आली की ती घेऊन महापालिकेच्या कसबा पेठेतील जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात खेटा माराव्या लागतात. त्यानंतर कधीतरी हा जन्म दाखला मिळतो. ही सध्याची वेळखाऊ प्रक्रिया आता थांबणार आहे.
‘ससून’मध्ये दाखले देण्याची यंत्रणा नसल्याने, येथे घडणाऱ्या जन्म-मृत्यूच्या घटनांच्या नोंदी व दाखले वितरण करण्याचे कामकाज पुणे महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाव्दारेच होत आहे. त्यामुळे जन्म व मृत्यूच्या नोंदणी करून स्वत:च मृत्यू अथवा जन्म दाखले द्यावेत असे आदेश राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने १२ एप्रिल, २०१८ रोजीच ससून सर्वोपचार रुग्णालयाला दिले होते.
चौकट
अशीही तत्परता
लोकांचे हेलपाटे वाचवणारा आदेश तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळातला. पण सरकारी यंत्रणेंची कार्यतत्परता अशी की, याची पूर्तता झाली ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात. दरम्यान सुमारे तीन वर्षांचा कालावधी गेला. आता केंद्र शासनाच्या जन्म आणि मृत्यू अधिनियम कायद्यातील तरतुदीनुसार, ससूनमध्ये ‘निबंधक,जन्म व मृत्यू’ यांची स्वतंत्र नियुक्ती करण्यात आली आहे. या यंत्रणेत पहिल्या काही दिवसांमध्ये प्रथम जन्म घटनांच्या दाखले वितरित करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. ही कार्यवाही अंतिम टप्प्यात असून, शासनाकडून जन्म-मृत्यूच्या संगणकीय नोंदीसाठी आवश्यक आयडी व पासवर्ड या आठवड्यात मिळून गणेशोत्सवाच्या काळातच या ‘जन्म दाखला’ नोंदणी व वितरणाचा ‘श्रीगणेशा’ ससून रुग्णालयात होईल.