पुणे : कोरोनाकाळात वाढलेले मृत्यू, जन्म आणि त्यांच्या नोंदींचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, नागरिकांना मानस्ताप सहन करावा लागत आहे. महापालिकेकडून केंद्राच्या ‘सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम’कडे बोट दाखविले जात आहे. वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने वेळेत नोंदी होत नाहीत. तसेच, जन्म-मृत्यूचा नेमका आकडा समजत नसल्याने आकडेवारीचा घोळ कायम आहे. हा सर्व्हर डाऊन असल्याने राज्यातील नोंदी तीन दिवसांपासून रखडल्या आहेत.
शहरात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून मृत्यूच्या आकड्यात तफावत असल्याचे म्हटले जात आहे. प्रशासनाकडून यावर स्पष्टपणे उत्तर दिले जात नाही. त्यातच चालू वर्षातील पाच महिन्यांची आकडेवारीही पालिकेला देत येत नाही. वास्तविक पालिकेकडे हा आकडा तयार असणे अपेक्षित आहे. परंतु, हा आकडा जाणीवपूर्वक ठेवला जात नाही की काय, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत पालिकेची स्वतःची जन्म-मृत्यू नोंदणीची यंत्रणा होती. या प्रणालीद्वारे नोंदी केल्या जात होत्या. मात्र, २०१६ साली केंद्र शासनाने ‘सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम’प्रणाली (सॉफ्टवेअर) सुरू केली. त्याचे प्रशिक्षण दिल्यानंतर, २०१९ साली पालिकेने हे प्रणाली स्वीकारली. त्यानुसार, नोंदी करण्याचे काम सुरू केले. या प्रणालीनुसार प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय लॉग-इन आयडी आणि पासवर्ड देण्यात आले. या प्रणालीमध्ये माहिती भरली जाते. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांसाठी १६ निबंधकांची राज्य शासनाच्या मान्यतेने नेमणूक करण्यात आली. यामध्ये एक निबंधक जुन्या दुरुस्त्या करण्यासाठी नेमण्यात आलेला आहे. या कामाचे २०२० साली विकेंद्रीकरण करण्यात आले. पालिकेच्या पाचही परिमंडळ निहाय जबाबदारी देण्यात आली.
या सर्व उपाययोजना करूनही नोंदी करण्याचे काम सुरळीत होत नसल्याच्या तक्रारी आहेत. कोरोना काळात नेमके किती मृत्यू झाले आहेत? त्यामध्ये कोरोनाचे किती आणि अन्य मृत्यू किती याची आकडेवारी देण्यातही पालिकेचा आरोग्य विभाग हतबल आहे. ही आकडेवारी का ठेवली जात नाही हा प्रश्न आहे.