पुणे : सावत्र आईकडून मुलांना दिल्या जाणा-या वागणुकीबददल अनेकदा ऐकले असेल, पण एका जन्मदात्या आईपेक्षा सावत्र आईचं सर्वश्रेष्ठ ठरल्याचे उदाहरण समोर आले आहे. जेव्हा आईने आर्थिक कारण पुढे करीत पोटच्या मुलाच्या संगोपनाची जबाबदारी नाकारली. तेव्हा सावत्र आईने त्या मुलाची जबाबदारी स्वीकारली. कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश संगीता पहाडे यांनी लहान मुलाच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी ही सावत्र आईकडे सुपूर्द करण्याचा आदेश दिला.
एका उच्चशिक्षित शासकीय अधिका-याचं पहिलं लग्न झालं. त्यांना दोन मुली झाल्या. लग्नाच्या वीस वषार्नंतर पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला. दुस-या पत्नीपासून त्यांना मुलगा झाला. परंतु दुस-या पत्नीशी वाद होऊ लागल्यानंतर त्यांनी दुस-या पत्नीशीही घटस्फोट घेतला. त्यावेळी मुलगा 8 वर्षांचा होता. त्यांनी पुन्हा पहिल्या पत्नीशी विवाह केला. त्यांची बदली आयआयटी भागलपूर येथे झाली. मात्र त्यानंतर एका महिन्यातच कोरोनाच्या आजाराने त्यांचा मृत्यू झाला.
त्यावेळी त्यांचा मुलगा हा पाचगणी येथे शिक्षण घेत होता. वडिलांच्या अकाली मृत्यूने त्या मुलाचं पाचगणीच्या शाळेतील अँडमिशन रद्द करून घ्यावी लागली. दरम्यान जन्मदात्या आईने मुलाला पहिल्या पत्नीने व तिच्या मुलींनी पळवून नेलेला असून, त्याचा ताबा तिच्याकडे द्यावा म्हणून पोलिसांकडे तक्रारी दिली. त्यावेळी सावत्र आईने लहान मुलाचा ताबा त्याच्या आईकडे देण्याची तयारी दर्शवली. परंतु जन्मदात्या आईने आर्थिक कारण देत या मुलाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे त्या मुलाला अनाथ आश्रम मध्ये टाकण्याची वेळ आली. परंतु ,सावत्र आईने स्वत:हून या मुलाचं पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी घेऊन त्याबाबत त्या मुलाचा पालकत्व मिळावं म्हणून न्यायालयामध्ये वकील हेमंत झंजाड यांच्यामार्फत अर्ज केला.
वकील हेमंत झंजाड यांनी न्यायालयाच्या निदर्शनास सर्व बाबी आणून दिल्या व पहिली पत्नी त्या लहान मुलाला सांभाळण्यास सक्षम आहे याचे पुरावे सादर केले. जन्मदाती आई सुद्धा या प्रकरणांमध्ये हजर झाली. तिने आर्थिक कारण देऊन मुलाला सांभळण्यास असमर्थता दर्शवली व मुलाच्या संपूर्ण संगोपनाची जबाबदारी सावत्र आईला देण्याबाबत मान्यता दिली. त्यामुळे न्यायालय मध्ये तडजोड होऊन त्या मुलाच्या भविष्यासाठी न्यायालयाने वकील हेमंत झंजाड यांचा युक्तिवाद मान्य करून व उपलब्ध पुराव्यानिशी त्या लहान मुलाच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी ही सावत्र आईला दिली.